मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेत (shivsena) दुसरं बंड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे 12 खासदार आज बंड करणार आहेत. हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून आपला वेगळा गट स्थापन करणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते. या खासदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही मार्गदर्शन केल्याचं वृत्त आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख या पदावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिंदे गटाने आज कार्यकारिणीच निवडल्याने शिवसेनेवर ताबा मिळवण्याचा शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं म्हणून शिंदे गटाने या हालचाली सुरू केल्याचंही सांगितलं जात आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे हे ट्रायडन्ट हॉटेलला पोहोचले. यावेळी त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेचे 12 खासदार ऑनालाईनद्वारे उपस्थित होते. या बैठकीत शिंदे गटाची कार्यकारिणी निवडण्यात आली. एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भावना गवळी यांनाच संसदेच्या प्रतोदपदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राहुल शेवाळे यांच्याकडे संसदेतील गटनेतेपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचे 12 ते 14 खासदार हे लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. हे खासदार संसदेत आपला वेगळा गट करण्यासाठीचं पत्रं लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. तसेच राहुल शेवाळे हे आपले गटनेते आणि भावना गवळी या मुख्यप्रतोद असल्याचं पत्रंही या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.