Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकच्या जागेबद्दल मोठी अपडेट
Eknath Shinde : आज 1 मे महाराष्ट्र दिन. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या हुतात्मा चौकात 106 हुतात्म्यांना अभिवादन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय भाष्य केलं. महाराष्ट्राने देशाला विचार दिले, दिशा दिली. पण त्याच महाराष्ट्रात राजकारणाची भाषा बिघडताना दिसतेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या हुतात्मा चौकात येऊन 106 हुतात्म्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्रदिनाच्या, जागतिक कामगार दिनाच्या महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. 106 हुतात्म्यांनी बलिदानाने मुंबईसह महाराष्ट्र मिळवला, तो हा दिवस. हुतात्म्यांना अभिवादन करतो. महाराष्ट्रात मंगल कलश आला तो हा दिवस. म्हणून पुन्हा एकदा हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. हुतात्मा स्मारकात आल्यानंतर ऊर्जा, प्रेरणा लोकांना मिळते. 106 हुतात्म्यांच बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. राज्याने देशाला विचार दिले, संविधान दिलं, असा हा महाराष्ट्र आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “65 वर्षांचा मोठा पल्ला गाठला आहे. अजून बरचं काही करायचं बाकी आहे. मागच्या दोन वर्षात सर्वसामान्यांच्या सरकारने अनेक निर्णय घेतले. योजना आणल्या, अनेक विकास प्रकल्पांना चालना दिली. म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हा खरा ध्यास आहे. गोरगरीब जनता, माताभगिनी यांच्या जीवनात आनंद आणणं हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राने देशाला विचार दिले, दिशा दिली. पण त्याच महाराष्ट्रात राजकारणाची भाषा बिघडताना दिसतेय, या पत्रकारांच्या प्रश्नवावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “महाराष्ट्र एक संस्कृत राज्य आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. निवडणुका येतात-जातात. पण राज्यकर्ते कोण-काय करतं, हे मागे राहतं. दुर्देवाने राजकारणाची पातळी खालावली आहे. रोज शिव्या, शाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला-पाहायला मिळत नाही” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबईत महायुती किती जागा जिंकेल?
मुंबईत महायुती 6 च्या 6 जागा जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षात उत्तम काम केलय. त्यांचं मुंबईवर प्रेम आहे. पाठबळ दिलं. मुंबईत जे बंद पाडलेले प्रकल्प होते, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड त्यांना आम्ही चालना दिली. मुंबईत डीप क्लिन ड्राइव्ह केलं, त्यामुळे मुंबईत प्रदूषण कमी झालं. मुंबई खड्डे मुक्त करणार. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक गल्लीपर्यंत नेणार. आरोग्य, शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर यावर आम्ही फोकस केलाय. त्यामुळे मुंबईत सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू” असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नाशिकचा तिढा आज सुटेल, तुम्हाला लवकरच बातमी मिळेल’