मोदी प्रचाराचा धुरळा उडवणार, एकट्या महाराष्ट्रात 25 सभा
मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार असून, 11 एप्रिलला पहिला टप्पा असेल. त्यामुळे प्रचाराची रणनीती आखून, काही पक्ष रणांगणात उतरलेही आहेत. भाजपनेही प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रात 25 मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यात योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित […]
मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार असून, 11 एप्रिलला पहिला टप्पा असेल. त्यामुळे प्रचाराची रणनीती आखून, काही पक्ष रणांगणात उतरलेही आहेत. भाजपनेही प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रात 25 मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यात योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत. तर काही सभांना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, शिवसेना आणि भाजप युतीची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे हे मोठ्या कालावधीनंतर एका व्यासपीठावर दिसतील. या सभेचं ठिकाण आणि तारीख अद्याप निश्चीत झालं नसलं, तरी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या संयुक्त सभेसाठी प्रचंड उत्सुकता आहे.
महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते मंडळी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे.
राज्यातील 48 मतदारसंघांमध्येही प्रचार होऊ शकेल, अशा पद्धतीने भाजपकडून 25 सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.