5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात सामिल होणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
आता शेतकरी आणि रिक्षावाल्याचा मुलगा या राज्यात मुख्यमंत्री होतोय. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेलेच मुख्यमंत्री व्हायचे. आता चित्रं पालटलं आहे, असंही ते म्हणाले.
नजीर खान, टीव्ही9 प्रतिनिधी, परभणी: शिवसेनेत (shiv sena) सर्व काही अलबेल नाहीये. अजून पाच आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात (shinde camp) येणार आहेत. लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असा दावा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केला आहे. सत्तार यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. अब्दुल सत्तार हे परभणी दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केल्याने चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
शिवसेनेला नुसतंच खिंडार पडणार नाही तर येत्या दहा वर्षात उद्धव ठाकरे यांची राज्यात सत्ताच येणार नाही. मी सांगतो ते लक्षात ठेवा, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आम्ही 40 आमदार प्लस 10, त्यात पाच आमदार आणखीन येणार आहेत. पहिले 10 खासदार होते नंतर 12 खासदार झाले. दोन-तीन आणखीन येणार आहे. तरी हे लोक म्हणतात हे असली, हे नकली. अरे ते येणारे का पागल आहेत का? आणि हे आले सती सावित्री, आता गल्ली बोळात फिरत आहेत. अरे पहिले असे फिरले असते तर ही वेळ आली नसती ना, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी कितीही प्रयत्न करू द्यात, आता त्यांचं सरकार येणार नाही. पुढची दहा वर्ष त्यांची सत्ता येणार नाही. मीही कार्यकर्ता आहे. मलाही राजकारण कळतं. हे घरात बसून राहिले. काही केलं नाही. मुख्यमंत्री असताना काही केलं नाही. आता काय करणार आहेत? असा सवाल करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सरदाराने मैदानात सर्वात पुढे असलं पाहिजे. हे सुद्धा त्यांना करता आलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.
आता शेतकरी आणि रिक्षावाल्याचा मुलगा या राज्यात मुख्यमंत्री होतोय. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेलेच मुख्यमंत्री व्हायचे. आता चित्रं पालटलं आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते परभणीत आले होते. यावेळी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. तेव्हा सत्तार यांनी गाडीतून उतरून या शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचं निवेदनही स्वीकारलं. त्यानंतर सत्तार यांचा ताफा पुढे गेला.