Uddhav Thackeray : दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, उद्धव ठाकरेंचा इशारा; पत्रकार परिषदेतील 8 मोठे मुद्दे
Uddhav Thackeray : भाजपचा वंश कुठून सुरू झाला हे पाहायचं आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहे. तर भाजपचा वंश कोणता आहे. आजचं त्यांचं राजकारण निर्घृण आणि घृणास्पद आहे. जे येतील ते आपले हे राजकारणात मी समजू शकतो.
मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधत भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला. भाजपचा वंश कुठून सुरू होतो हे पाहावे लागेल. दिवस सारखे राहत नाहीत. दिवस येतात आणि जातात. काळ सारखाच राहत नाही. नंतर जे लोक येतील ते तुमच्यासारखेच वागले तर काय होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची, हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
त्यांचे विधान देशाला हुकूमशाहीकडे नेणारे
सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ देणं त्यात मदत करायची की नाही हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे. भाजप सोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपणार आहे, असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. त्यांनी हे करूनच पाहावं, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
भाजपचा वंश कुठून सुरू झाला?
भाजपचा वंश कुठून सुरू झाला हे पाहायचं आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहे. तर भाजपचा वंश कोणता आहे. आजचं त्यांचं राजकारण निर्घृण आणि घृणास्पद आहे. जे येतील ते आपले हे राजकारणात मी समजू शकतो. केवळ सोबत येतील ते नाही तर जे गुलाम होतील ते काही काळ आपले. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील. हे गुलाम जातील. ही गुलामगिरीकडे वाटचाल आहे. त्याचा निषेध केला पाहिजे, असंही ते म्हणाले.
दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा
ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत. ठिक आहे. राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतात. आजच्या राजकारणात बुद्धीचा नाही, बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस सर्वदा सारखे नसतात. दिवस फिरतात. दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असा इशाराही त्यांनी दिला.
सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत…
संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा? पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले, हमाममध्ये आंघोळीला गेले, तसा संजय जाऊ शकला असता. पण तो गेला नाही. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे, तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल, असंही ते म्हणाले.
पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेसमोर जा
दुसऱ्या महायुद्धात हिटलर जिंकेल असं वाटत होते. त्यावेळी डेव्हिड लो रोज एक व्यंगचित्र काढायचा आणि हिटलर नामोहरम व्हायचा. हा माणूस कोण आहे? त्याला घेऊन या, असे आदेशच हिटलरने दिले होते. तेच आज देशात चाललंय आहे. जरा कोण बोललं तर त्याला दमदाटी केली जात आहे. बऱ्या बोलाने किंवा लोभाने आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. ही अटक आणि सर्व गोष्टी पाहिल्यावर मला गडकरींसारखं वाटत आहे. राजकारण सोडायचं नाही. पण राजकारणाची घृणा वाटत आहे. राजकारणात दिलदारपणा पाहिजे. तुम्हाला पक्ष संपवायची हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा. इतरांना विचार नाही तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे, असंही ते म्हणाले.
दिवस आणि काळ सर्वांसाठी चांगला नसतो
काँग्रेसने 60 वर्ष राज्य केलं. पण काँग्रेसची परिस्थिती पाहिली तर आज सत्तेत असलेल्यांनी बढाया मारण्याची गरज नाही. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. पण डोक्यात हवा नव्हती. मी जाऊ दिली नाही. या सर्व गोष्टी येतात, जातात. पण लोकांशी नम्र राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आज ज्यांच्या डोक्यात हवा आहे. त्यांना सांगतो निर्घृणपणे वागू नका. दिवस आणि काळ सर्वांसाठी चांगला नसतो. काळ बदलतो. तो काळ बदलल्यावर आपण जसे लोकांशी वागलो तर तो बदललेला काळ तुमच्याशी जास्त दृष्टपणाने वागू शकतो. ती संस्कृती आपल्यात नाही, असं त्यांनी सांगितलं.
राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान
प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या (मी राज्यपाल हा शब्द मुद्दाम वापरत नाही) कोश्यारींच्या उद्गारातून झाली आहे. आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची. राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.
सोबत दमदार आणि वफादार आहेत
देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने आणीबाणी पाठिंबा दिला होता. तेव्हा ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता तेही आणीबाणीच्या विरोधात उतरले होते. पुल देशपांडे, दुर्गा भागवत साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं. आता वेळ गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनतेनेही एकत्र आलं पाहिजे. एक दलाल बोलला यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. पण माझ्या सोबत दमदार आणि वफादार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.