जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीत खळबळ
राष्ट्रवादीचे 90 टक्के कार्यकर्ते म्हणतील आता आपल्याला भाजपात जावं लागेल. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे. तिथे नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात वाद होईल.
सांगली: शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) फुटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तशी चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी त्याबाबतचं विधान केल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्या घरावर येत्या काही दिवसात भाजपचा झेंडा फडकताना दिसेल, असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. पडळकर यांच्या या विधानामुळे भाजप राष्ट्रवादीला फोडणार की काय? अशी चर्चा रंगली आहे.
गोपीचंद पडळकर सांगली येथील एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागतो. मी विश्वासाने सांगतो हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे 90 टक्के कार्यकर्ते म्हणतील आता आपल्याला भाजपात जावं लागेल. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे. तिथे नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोकं म्हणतील आता भाजपमध्येच जाऊया. आता काही पुढं राहिलं नाही, असा दावाही त्यांनी केला. पडळकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून हा पक्ष फोडला. त्यांचं दुसरं टार्गेट राष्ट्रवादी असू शकते असं मी बोललो होतो, असं रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी फोडणं सोप्पं नाही. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. पण त्यांना लोकशाही माहीत नाही. ठोकशाही माहीत आहे. त्यामुळे त्यांचं दुसरं लक्ष्य कदाचित राष्ट्रवादी असेल, असंही रोहित पवार म्हणाले.