जमलेल्या माझ्या तमाम….! शिवसैनिकांना उद्देशून उच्चारलेला उद्धव ठाकरेंचा शब्दान शब्द.. जसाच्या तसा
Uddhav Thackeray : वापरायचं आणि फेकून द्यायचं, असे हे भाजपवाले. समता, ममता, जय ललितासह अटलजींनी सरकार चालवलं. आपणही त्यांना साथ दिली. भगवा जो फडकला आहे, तो उतरु देऊ नका, अशी तेव्हा आमची भूमिका होती.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचं निमित्त साधत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांसोबत संवाद साधला. भाजपला सडेजोड भाषेत सुनावणं, आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार करणं, तसंच शिवसेनेची पुढची रणनिती ठरवणं, या सर्वच पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात यावेळी केली. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका पार पडली. यावेळी वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. हा संवाद साधताना त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून उच्चारलेला शब्दान शब्द काय होता.. वाचा उद्धव ठाकरे यांचं सविस्तर भाषण…
उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण अनकट
जय महाराष्ट्र सगळ्यांना…
जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो..
गेल्या वर्षी साधारणपणे फेब्रुवारीला आपण भेटलो होतो वर्षावर! राज्यभर संपर्क मोहीम राबवायची, असं ठरवत होतो. पण नेमकी दुसरी लाट होती. आताही पुन्हा संपर्क मोहीम राबवणार होतो. पण त्याच वेळी नेमका मानेचा त्रास सुरु झाला.
पुन्हा उभा राहत होतो की कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली. जर कोरोनाच्या एकामागोमाग एकलाटा येत असतील. तर आपल्या शिवसेनेच्या लाटा का येऊ शकत नाही…?
दिल्लीत शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आपल्याला उभा करायचा आहेच!
दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवलं, ते जर आपण पूर्ण करु शकत असून, तर आणि तरच.. या सगळ्याला अर्थ आहे..
आजचा एक दिवस आपल्या शिवसैनिकांच्या आयुष्यातला सण असतो. प्रचंड संख्येनं आपण सगळे मातोश्रीवर यायचात.
पहाटेच्या सुमारास शरद आमोणकर यायचे. आपल्या षणमुखानंदमध्ये कार्यक्रम असायचा. 23 जानेवारी 19 जून आणि 13 ऑगस्ट या तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेतच. खरंतर आज प्रमोद नवलकरांचाही आज जन्मदिवस आहे.
नवलकर काय, शिवसेना प्रमुखांचे तेव्हाचे सगळे साथी सोबती, या सगळ्यांनी केलेलं काम, त्यांची मेहनत यांनी वटवृक्ष हा उभारला, त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. तेव्हापासूनचा शिवसैनिकांना संध्याकाळी भेटण्याचा हा रिवाज आपण मोडू शकत नाही.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण आज जोडले गेलो आहोत. आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनंतर आलो आहे. एक दोन महिन्यानंतरही उपचारातच गेले. आजही फिजीओ थेरेपी सुरुच होती.
मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांनी भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलेलं हेच. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून विरोधक आता काहीही खाजवतायत.
शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. आपल्याला हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती. सत्तेसाठी आपण हिंदुत्त्व कधीच वापरलं नाही आणि वापरणारही नाही.
गाढवं, किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलंय. आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं. आम्ही हिंदुत्त्वापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मध्यंतरी अमित शहा पुण्यात आले. म्हणाले एकट्यानं लढा.. ठिकै.. आम्ही एकट्यानं लढू.. पण मग तुमच्या अधिकारांचा गैरवापर करायचा नाही. राजकारणात जसं भिडायचंय असतं तसं भिडा, मग होऊन दे सामना..
इडीची पिडा लावायची आणि लढ म्हणायचे, अशांनी आव्हान देण्याची शिवसैनिकाला गरज नाही..
वापरायचं आणि फेकून द्यायचं, असे हे भाजपवाले. समता, ममता, जय ललितासह अटलजींनी सरकार चालवलं. आपणही त्यांना साथ दिली. भगवा जो फडकला आहे, तो उतरु देऊ नका, अशी तेव्हा आमची भूमिका होती.
मध्ये एकदा मी नवं हिंदू शब्द वापरला होता. या शब्दाचा वापर भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी केला आहे. सोयीप्रमाणे बदलणारं हिंदुत्व आहे. भाजपची युती ही फक्त त्यांना सत्तेसाठी हवी होती. सत्तेसाठी संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशीही त्यांनी युती केली.. चंद्राबाबूशी युती केली…. सत्तेसाठी कुणाशीही युती करायला भाजप तयार आहे..!
खरे हिंदू असाल, तर एक धोरण घेऊन पुढे चला..
आम्ही लोकशाहीचा अपमान केला? तुमचं गुलाम म्हणून असलेलं स्वप्न आम्ही मोडून पाडलं, म्हणजे लोकशाहीचा अपमान..? आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली… उजेडात शपथ घेतली.. शिवतीर्थावर सगळ्यांसमोर शपथ घेतली. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवीन घरोबा केला. सरकार फोडून, आमदार फोडून तुम्ही सरकारं केली. फोडाफोडी करुन सांगायचं की बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही…
काल परवा ज्या निवडणुका झाल्या… बँका, नगरपंचायती, विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, महाराष्ट्र सोडूनही आपण आता निवडणुका लढवायच्या आहेत. खरं हिंदुत्व घेऊन आपण पुढे जाऊ. हरलो तरी खचायचं नाही. आणि जिंकलो तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. आता झालेल्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.
शिवसेनेचं असं का होतं, असे अनेक लेख आले. जे काही निवडून आलेले शिवसेनेचे लोक आहेत, तो आकडा जास्तच आहे. आपण नंबर चार वर आहोत. आजपर्यंत नगरपंचायती निवडणुकांमध्ये युतीत लढलो होतो, त्यापेक्षा जास्त लोक आमचे निवडून आले आहेत. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी..
पण आपण जेवढ्या जिद्दीनं विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका लढवतो, तेवढ्या जिद्दीनं निवडणुका लढवत नाही आहोत.. इतर पक्ष ज्याप्रमाणे छोट्या निवडणुका लढत आहेत, तसे आपण लढत नाही. याला मीही जबाबदार आहे. यापुढे आपण आता हे टाळलं पाहिजे. दोन विधानपरिषदा आपण हरलो. काही जण म्हणतात, आपल्यातच गद्दारी झाली. पण आता आपल्याच आईचं दूध विकणारी औलाद आपल्यात नाही. असे कुणी असतील तर त्यांनी शिवसेना सोडावी. लढाईत हारजीत ठरते, ती निष्ठेवरच ठरते. गद्दारी खरचं होतेय का..? नाही… पण दुर्लक्ष होतंय.
गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यात संस्थात्मक काम केली पाहिजेत. सहाकरमध्ये आपण काय करतोय? नव्या संस्था उभ्या करण्यात आपण काय करतोय? संस्थात्मक कामं आपण का करत नाही? दूरगामी कशी काम करता यायला हवीत. आताच्या संधीचं सोन करायला हवं.
आपण लढण्यात कधीच मागे पडलेलो नाही. शिवसैनिकांसारखं बळ क्वचितच कुण्या प्रादेशिक पक्षाकडे असेल. शंभर दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगू, असं बाळासाहेब म्हणायचे. बंगालच्या वाघिणीचा आदर्श घ्या. तिनं एकच फटका मारला नंतर कुणीच त्या वाटेला गेलं नाही.
बाबरी पाडली, त्या वेळेला गर्व से कहो हम हिंदू है, आणि बाबरी पाडलेल्यांचा मला अभिमान आहे, असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा जर आपण सीमोल्लोघन केलं असत, तर न जाणो शिवसेनेचा पंतप्रधान आज दिसला असता. तुम्ही देश सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, असं म्हणणाऱ्यांनी दगा दिला. त्यांना उलटा पंजा मारावाच लागला. आम्ही झोकून देऊन तुमचा प्रचार केला. ते जे म्हणतात ना… आमचा चेहरा वापरुन तुम्ही जिंकलात! तर हेच मीही म्हणू शकतो. पण जिंकल्यानंतर वापरा आणि फेकून द्या… अशी तुम्ही भूमिका घेतली.
एनडीएमध्ये आता फार काही पूर्वीची लोकं राहिलेली नाही. सर्वांना घेऊन तुम्ही जिंकले आणि एकटेच वरती जाऊन बसले. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर शिवसेनाच कधीच करणार नाही.
ज्या बलवान हिदुस्तानचं स्वप्न आम्ही बघितलं, ते कुणाला बोटाखाली चिरडण्यासाठी नव्हतं.
गुलामगिरीचं वातावरण तयार करणं, हे हिंदुत्त्व नाही.
देशाचे नागरिक आज गप्प बसले, तर पुन्हा गुलामागिरी येईल, अशी स्थिती निर्माण केली जातेय. यांना वेळीच रोखण्यासाठी शिवसेनेला लढा द्यावा लागणार आहे. प्रत्यक्ष रणांगणात उतरण्यासाठी मी बाळासाहेबांची प्रतीमा सोबत ठेवतो. ती काही चांगली फ्रेम तयार व्हावी माझी म्हणून ठेवत नाही.
यापुढे प्रत्येक निवडणुकीत, बँक, स्थानिक स्वराज्य संस्था, कोणतीही निवडणूक जिंकायचीच, अशा हेतूनंच ती लढायची आहे.
आशा ताईंचं एक गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला. तुमची बहुतांश गाणी हिट होण्याच रहस्य काय? पण आजही मला गायला येणारं गाणं, हे पहिलंच गाणं आहे असं समजून मी त्याच्याकडे पाहते. हा विचार आपण आत्मसात करायला हवा. अनेकदा फाजील आत्मविश्वास नडतो. आत्मविश्वास असावा. पण तो फाजील नसावा.
आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी एकच सांगितलं. तुम्ही सगळे शिवजी महाराजांना मानता ना.. मग असं समजा आजही ते रायगडावर आहेत. ते आजही आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील, अशी कामगिरी करा. आपल्याला टकमक टोक दाखवणार नाही, असं वागू नका. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप.. आपल्यात लढायची इर्षा येते कुठून… ? हेच बाळासाहेबांबाबत आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाळासाहेब आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील असं काम आपल्याला करायचं आहे. जीव द्यायला तयार असणारे शिवसैनिक आपल्याकडे आहेत. पण जीव द्यायचा नाही. अहोरात्र मेहनत करायची आहे. भगवा काही स्वस्त पैशांत मिळतो म्हणून तो आपण हातात घेतलेला नाही. भगवा तेजस्वी आहे आणि त्याची ताकद आपल्याला वाढवायची आहे, म्हणून हा भगवा आपण हातात घेतला आहे.
एवढ बोलून मी थांबतो… जय हिंद… जय महाराष्ट्र…
संबंधित बातम्या :
दिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट
‘बाळासाहेब असते तर…’ कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा