मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत काय निकाल देतं याकडे फक्त राज्याचं नाही तर देशाचं लक्ष आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा खटला हा ऐतिहासिक खटला आहे. यापूर्वी अशी घटना महाराष्ट्रात कधीच घडली नव्हती. या घटनेतून यापुढे सुप्रीम कोर्ट काही महत्त्वाचे नियम जारी करण्याची शक्यता आहे. पण ते नेमकं काय असेल ते निकाल जाहीर झाल्यावर समजेल.
संपूर्ण देश या निकालाची वाट पाहत आहे. शिवसेनेचा ठाकरे गट, शिंदे गट यांच्यासह भाजप, महाविकास आघाडीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. राज्यात सध्या बहुमताचं सरकार असलं तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर होण्यापर्यंत तरी या सरकारबद्दल अनेकांच्या मनात हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का याबाबत शंका असण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तारही गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. कदाचित सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे. असं असताना आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
“हे 40 लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
राज्यात नऊ महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शिंदे यांनी भाजपसोबत एकत्र येत नवं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. पण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आलेला नाही.