24 तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं करा, नाही तर… आदित्य ठाकरे यांचा लोढा यांना इशारा
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेत कार्यालय दिलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई | 21 जुलै 2023 : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेत कार्यालय दिलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. पालकमंत्र्यांना महापालिकेत कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? त्यांनी तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं. येत्या 24 तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. पण कुठेही असं दालन हडपलं नाही. हे थांबलं पाहिजे. बदलंल पाहिजे. नाही तर मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरांना दालन दिलं पाहिजे. आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे. या दालनात पालकमंत्री नाहीत तर भाजपचे माजी नगरसेवक बसले होते. नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे 24 तासात थांबलं नाही. केबिन खाली केली नाही तर कधी ना कधी तरी मुंबईकर राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल माहीत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईकरांचा राग पाहिला असेल
मुंबईकरांचा मोर्चा तुम्ही पाहिला असेल. 1 जुलै रोजी मुंबईकरांनी आपला राग व्यक्त केला आहे. आता असं जर बिल्डर कंत्राटदारांचं सरकार पालिकेत बसणार असेल तर तिथे टॉवर येतील. पुढचे पालक मंत्री टॉवर बांधतील, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आता कुठेही तुम्ही महाराष्ट्रात जा. ज्या घोषणा वर्षभरात झाल्या. त्या फक्त होर्डिंगसाठी झाल्या आहेत. प्रत्यक्षात कामं नाहीये. कृषी आणि उद्योग क्षेत्र कोलमडलं आहे, असा दावा त्यांनी केला.
आम्हाला बोलू दिलं नाही
मणिपूरबाबत आम्हाला बोलू दिलं नाही. ज्या महिलांची धिंड काढली त्यातील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या जवानाची पत्नी आहे. तिच्यावर असा अत्याचार होत असेल तर कुठे गेली तुमची देशभक्ती? कुठे गेलं तुमचं देशप्रेम? तुम्ही महिला असणं गरजेचं नाहीये. तुम्ही कुणाचा भाऊ, बहीण आणि आई असणं गरजेचं नाही. या देशातील नागरिक म्हणून जर असं कुणाबाबत घडलं तर तुम्हाला राग आलाच पाहिजे. संताप आलाच पाहिजे, असं ते म्हणाले.
सरकार बरखास्त करा
मणिपूर दुर्घटना ही जागतिक ट्रॅजेडी आहे. या मणिपूरच्या सरकारमुळे देशात आणि जगात आपलं नाव खराब होत आहे. त्यामुळे मणिपूरमधील सरकार बरखास्त केलं पाहिजे. तिथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.