‘लोकशाही धोक्यात, त्यांच्या मनात भीती’, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर आदित्य ठाकरे आक्रमक
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ."सत्याच्या विरोधात जे उभे राहत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त राजकीय नेतेच नाहीत तर पत्रकारांसोबतही असे प्रकार घडत आहेत", असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आहेत. “ज्यांच्या मनात भीती असते आणि ज्यांना आवाज ऐकून घेण्याची सवय नसते अशीच लोकं अशी पाऊलं उचलू शकतात आणि तेच पाऊल आज पडलेलं आहे. ही कारवाई मी फक्त राहुल गांधी किंवा एका खासदारापर्यंत मर्यादित ठेवणार नाही. ही कारवाई एवढंच दाखवते की, आपल्या देशातील लोकशाही संपत चाललेली आहे. आपल्या देशात जे सत्य बोलतात त्यांना स्कोप राहिलेला नाही. ते आज समोर आलेलं आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
“राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. सगळंच धक्कादायक आहे. अशाप्रकारचा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तातडीने लोकसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवणं हे गरजेचं होतं का? ज्यांनी अपील केलं असेल त्या अपीलसाठी थांबणं अपेक्षित नव्हतं का? आम्ही सतत सांगत आलो आहोत की, लोकशाही धोक्यात आहे. आजचं पाऊल हेच सांगत आहे की लोकशाही संपत चाललेली आहे. राहुल गांधी जे बोलत असतील किंवा आम्ही सर्व बोलत आलेलो आहोत. आपण देखील पत्रकार विषय घेत असतो की, लोकशाही धोक्यात आहे. ते आज सिद्ध झालं आहे”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
‘माफी कशासाठी मागावी?’
“सत्यासाठी लढताना माफी कुणाची मागावी आणि कशासाठी मागावी? हा एक विषय आहे. दुसरं म्हणजे माफी मागितली नाही तर अपात्र ठरवायचं का? हे मोठं षडयंत्र रचल्यासारखं आहे. आम्ही आज रस्त्यावर आलोय ते फक्त राहुल गांधी यांच्यासाठी नाही. तर देशातील लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे”, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं.”सत्याच्या विरोधात जे उभे राहत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त राजकीय नेतेच नाहीत तर पत्रकारांसोबतही असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी लढणं जास्त आवश्यक आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“भीती तर चांगलीच असते. कारण सरकारच्या मनात भीती असते तेव्हा सरकारकडून अशाप्रकारची कारवाई केली जाते. पण आपला देश खरंच लोकशाहीच्या दिशेला जात असता तर अशी घटना घडली नसती. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाही आणि देशाच्या सिद्धांताच्या विरोधात आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.