मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वर्जमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वात आधी या सभेला संबोधित केलं. यावेळी मुंबई दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे कडालले.
“सभा सुरू व्हायच्या आधी मी प्रेसला देखील विनंती करेन की तिकडच्या खुर्ची भरायच्या आहेत. अजून लोक येत आहेत. नाहीतर आपली थोडी गडबड आपली होईल, आपल्याला वाटेल की ही गद्दारांची सभा आणि म्हणून खुर्च्या मोकळे राहिल्या. आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाहीत”, असा पहिला टोला आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात लगावला.
“आत्तापर्यंत जी काही सरकार पाहिली होती त्यांनी कधी मुंबईला झुकवण्याचं काम केलं नाही, मुंबईला मोडण्याचा काम केलं नव्हतं. पण या सरकारचा स्पष्ट मनसुबा आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचं. मुंबईला दिल्ली समोर झुकवायचं आहे. मी इशारा देतो, तुम्ही आम्हाला झुकवायला निघालात तर हा महाराष्ट्र तुम्हाला मोडेल पण वाकणार नाही. झुकणार नाही”, अशा शब्दांत आदित्य ठाकर गरजले.
“आम्ही सगळे जनतेतले लोक आहोत आणि आपण बघताय की समोरची सगळी जनता आलेली आहे. नागरिक आलेले आहेत. इथे मला कुठच्याही पक्षाचा भेदभाव दिसत नाही धर्माचा भेदभाव दिसत नाही. जातीचा भेदभाव दिसत नाही. इथे आम्ही सगळे संविधान रक्षक म्हणून एकत्र आलेलो आहोत. सगळे संविधान रक्षक माझ्यासमोर बसलेले आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“खरंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली. नागपूर मध्ये झाली. आजची तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. जेव्हा महाविकास आघाडीच्या सभा कुठे कुठे करायच्या हे ठरत होतं तेव्हा मी हट्ट धरला की 1 मे ची सभा ही आपल्या मुंबईत झाली पाहिजे. ही सभा महाराष्ट्राच्या राजधानीत झाली पाहिजे आणि तशी आज सभा होतेय”, असं ठाकरे म्हणाले.
“मुंबई ज्यांच्या ज्यांच्या बलिदानामुळे मुंबई ही महाराष्ट्र सोबत राहिली आणि संयुक्त महाराष्ट्र राहिला त्यांच्या सगळ्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्राची आठवण जी आहे ती फार महत्त्वाची आणि ती आठवण ठेवून आपल्या पुढचं कार्य करणे ही खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र दिन साजरा झालाच पाहिजे पण आज महाराष्ट्र जर आपण पाहिला तर गेल्या नऊ-दहा महिन्यांमध्ये अंधारात गेलेला आहे. हा महाराष्ट्र याच्यातून आपल्याला बाहेर काढायचा आणि सुवर्ण काळाकडे न्यायचा आहे”, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.