गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या आमदाराचा आपल्याच पक्षाला धक्का, भाजपसाठी खूशखबर
गुजरातमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपला आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे.
गांधीनगर : भारतीय जनता पक्षाने सातव्यांदा राज्यात सत्ता मिळवली आहे. भाजप 1980 पासून गुजरातमध्ये सत्तेत आहे. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 (Gujrat election 2022) मध्ये BJP ने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने यंदा 150 जागा जिंकल्या आहेत. आतापर्यंत इतकं मोठं यश कोणत्याच पक्षाला मिळालं नव्हतं.
गुजरातच्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. आता आम आदमी पक्षाच्या (AAP) एका आमदाराने भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. गुजरातच्या विसवादार येथून आमदार (AAP MLA) असलेले भूपत भायाणी (Bhupat Bhayani) यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. भायाणी हे भाजपमध्ये जातील असं बोललं जात होतं. पण ते भाजपमध्ये गेले नाही. त्यांनी बाहेरुन भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. हा निर्णय ते जनतेला विचारुनच घेतली असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकल्यानंतर जर ते भाजपमध्ये गेले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. तेथे पुन्हा पोटनिवडणूक होईल. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये न जाता बाहेरुन पाठिंबा दिलाय. या शिवाय 3 अपक्ष आमदारांनी देखील भाजपला पाठिंबा दिलाय. शपथविधी आधी भाजपला मोठी खूशखबरी मिळाली आहे.
गुजराच्या 182 जागांपैकी भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची मतदानाची टक्केवारी देखील घसरली आहे. आम आदमी पक्षाला 13 टक्के मतदान झालं आहे. देशात नरेंद्र आणि राज्यात भूपेंद्र अशा घोषणा दिल्या जात आहे. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.
काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. काँग्रेसचे मोठे नेते यंदा गुजरातमध्ये प्रचारासाठी दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला.