नरेंद्र मोदी यांचं पद 2028 पर्यंतच? केजरीवाल पंतप्रधान होणार? उद्धव ठाकरेंना अच्छे दिन? राज्यात पुन्हा अस्थैर्य? वाचा ज्योतिषांनी काय सांगितलं?
अनंत पांडव यांनी उद्धव ठाकरे यांच्याही कुंडलीचा अभ्यास केला. त्यांच्या दाव्यानुसार येत्या जानेवारीनंतर उद्धव ठाकरेंचं ग्रहमान बदलेल. त्यांचं पारडं जड होईल.
औरंगाबादः नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाच्या पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा विराजमान होतील. पण 2028 पर्यंतच त्यांच्या कुंडलीत हा योग असेल, त्यानंतर या पदावरून ते बाजूला होतील, अशी भविष्यवाणी औरंगाबाद येथील प्रसिद्ध ज्योतिषी, कुंडली अभ्यासक वेदमूर्ती अनंत पांडव (Anant Pandav) यांनी केली आहे. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुंडलीनुसार, जानेवारीनंतर त्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यांनंतर त्यांची राजकीय वाटचाल अगदी पूर्ववत होऊ शकते, असा दावा पांडव यांनी केला आहे.
महाराष्ट्रासाठी ही बातमी, हे भविष्य जास्त महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची मुख्य सुनावणी जानेवारी महिन्यात होत आहे. यानंतरच्या काळात उद्धव ठाकरेंचं पारडं जड असेल, असे भवितव्य वेदमूर्तींनी वर्तवलं आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात वास्तुशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचे अभ्यासक सहभागी झाले होते. अधिवेशनात उपस्थित वेदमूर्ती अनंत पांडव यांनी देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचंही भविष्य वर्तवलं. एका वृत्तवाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून महत्त्वाच्या नेत्यांचं भविष्य सांगण्यात आलंय.
मोदी 2028 पर्यंतच पंतप्रधान पदी?
वेदमूर्ती अनंत पांडव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीवरून सांगितलं, त्यांचे भाग्यस्थान हे चंद्रयुक्त असल्याने केंद्रात कुलदीपक नावाचा योग तयार झाला आहे. पराक्रमी शनि दशमात आहे. मोदींची पत्रिका उच्च दर्जाची आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना अनेक विरोधक तयार होतील.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत निश्चित त्यांना यश मिळेल. ते पुन्हा पंतप्रधान होतील, मात्र 2028 नंतर मात्र हे पद ते दुसऱ्याकडे देतील.. तेव्हापासून त्यांच्या कुंडलीत राहुची महादशा सुरु होईल…
भाजपाचं भवितव्य काय?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपातर्फे जोरदार तयारी केली जात आहे. मात्र येत्या काळात भाजपाला अनेक विरोधक तयार होतील. 2024 मध्ये दहशतवाद आणि राष्ट्रवादाचा मुद्दा देशात गाजेल. भाजप 418 चा आकडा कसाबसा गाठेल, असे भविष्य अनंत पांडव यांनी वर्तवलं आहे.
राहुल गांधी पंतप्रधान होणार?
भारत जोडो यात्रेद्वारे संपूर्ण देशभरात भ्रमंती केलेल्या राहुल गांधींना किती यश येणार याकडे राजकारण्यांचं लक्ष लागलंय. अनंत पांडव म्हणतात, राहुल गांधींच्या कुंडलीत राजयोग आहे. मात्र पंतप्रधान पदासारख्या उच्च पदापर्यंत ते पोहोचू शकणार नाहीत. कुंडलीतील रवी, मंगळ ग्रह त्यांना या पदापासून दूर ठेवतील.
केजरीवालांची दशाही बदलणार?
भाजपासमोर आम आदमी पार्टी थेट आव्हान उभं करतेय. अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदावर दावाही ठोकू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय. मात्र वेदमूर्ती अनंत पांडव म्हणातात, केजरीवाल यांच्या कुंडलीत शुक्र, गुरु, बुध ग्रहांची दृष्टी दशम स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना राजकीय जीवनात वेगळी ओळख प्राप्त होणार आहे.
मात्र 2026 नंतर कुंडलीची दशा बदलेल. राजकीय जीवनात त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. केजरीवाल पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असं भविष्य सांगतंय. एवढंच नाही तर 2026 नंतर केजरीवाल मुख्यमंत्रीही होऊ शकणार नाहीत, असं भविष्य अनंत पांडव यांनी वर्तवलंय.
योगी आदित्यनाथांना राजयोग?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ हेदेखील पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतील, असं म्हटलं जातं. पण अनंत पांडव यांनी वर्तवलेल्या भविष्यानुसार, त्यांच्या कुंडलीत सूर्य, बुध, ग्रहांमुळे राजयोग आहे. उच्चतम राजयोग प्राप्त झाल्याने ते मुख्यमंत्री बनले आहेत. आधीपासून राजयोग आहे. सन्यास राजयोग तयार होत आहे. मात्र ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुंडलीनुसार, त्यांची धनु रास आहे. शनि, गुरुची दृष्टी असल्याने येत्या काळात उच्च पदस्थ मानसन्मान मिळेल. शनिच्या साडेसातीचा उत्तरार्ध सुरु आहे. उत्तरार्धात राजपद प्राप्त करतील. उच्चपद प्राप्त करतील. मात्र ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर राहण्याची शक्यता कमीच वर्तवण्यात आली आहे.
फडणवीसांसमोर अडचणींचा डोंगर?
अनंत पांडव यांनी वर्तवलेल्या भविष्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात पक्षांतर्गत तसेच इतर राजकीय संघटनांकडून प्रचंड विऱोध होण्याची शक्यता आहे. लग्नस्थान व कर्मस्थानात बुधादित्याचा राजयोग आहे. त्यामुळे ते यावर मात करून ते यश मिळवतील.
महाराष्ट्राच्या कुंडलीत अस्थिरताच?
महाराष्ट्र राज्याच्या कुंडलीत आगामी काळात अस्थिरता असल्याचं अनंत पांडव म्हणाले. महाराष्ट्राच्या कुंडलीत शनि आणि गुरुचे भ्रमण असल्याने महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. विविध पक्षांमध्ये अस्थैर्य दिसून येईल. मात्र सरकार येत्या काळात पडेल, अशी शक्यता कमी आहे.
उद्धव ठाकरेंना अच्छे दिन येणार….
अनंत पांडव यांनी उद्धव ठाकरे यांच्याही कुंडलीचा अभ्यास केला. त्यांच्या दाव्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत शनि आणि गुरु महाराज असल्याने सहकाऱ्यांसोबत मतभेद उत्पन्न होऊ शकतात. एप्रिलपर्यंत ही स्थिती असेल. त्याचा त्यांना मानसिक त्रासही होईल.
जानेवारीनंतर स्थिरावता लाभेल. एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे मार्गक्रमण करतील. उद्धव ठाकरेच्या भविष्यातील जानेवारी महिना यासाठी विशेष आहे की, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील महत्त्वाची सुनावणी जानेवारी महिन्यात आहे. पुढील काळात उद्धव ठाकरेंचं पारडं जड राहणार असल्याचं भविष्य अनंत पांडव यांनी वर्तवलंय.