भुजबळांच्या मते, आघाडीतून ‘ही’ पाच नावं पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये!
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जळगावातील प्रचारसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी भुजबळांनी आघाडी सरकारमध्ये कोण कोण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहे, याची यादीच वाचून दाखवली. पंतप्रधानपदाच्या रेसमधील नावांची यादी भुजबळांनी वाचून दाखवल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं. जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत छगन भुजबळ बोलत […]
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जळगावातील प्रचारसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी भुजबळांनी आघाडी सरकारमध्ये कोण कोण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहे, याची यादीच वाचून दाखवली. पंतप्रधानपदाच्या रेसमधील नावांची यादी भुजबळांनी वाचून दाखवल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं. जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत छगन भुजबळ बोलत होते.
आघाडीकडून पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये कोण कोण?
“आघाडी सरकारकडे भाजपपेक्षा चांगली कामं करणारे उमेदवार हे पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या अध्यक्षा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात.”, असे छगन भुजबळ म्हणाले.
चौकीदाराच्या पगारात मोदींनी घर चालवून दाखवावं : भुजबळ
‘मैं चौकीदार हूँ’ची घोषणा देणाऱ्या मोदी सरकारने स्वतः मर्सडिज कारमधून न फिरता, चौकीदाराच्या पगारात घर चालवून दाखवावे आणि मग म्हणावे की, ‘मैं चौकीदार हूँ’, असा खोचक सल्ला भुजबळ यांनी मोदी सरकारला दिला.
तसेच, आतापर्यंत ‘शिकून मोठा हो’ असं सांगितलं जात होतं. मात्र आताचे पंतप्रधान मोदी ‘चौकीदार हो’ असं सांगत फिरतात. माझ्या परिचित एका तरुणांचं लग्न मोडलं याचं कारण आपण जाणून घेतलं, तेव्हा ‘मैं चौकीदार हूँ’ असं स्टेटस फेसबुकवर टकाल्यामुळे मुलीकडच्यांना तो चौकीदार असल्याचे वाटल्याने त्याचं लग्न मोडण्याचा किस्सा भुजबळ यांनी जाहीर सभेत सांगितला.
मोदी सरकारने तरुणांना रोजगार देऊ, असं आश्वासन दिले होते. पाच वर्षात दहा कोटी तरुणांना नोकऱ्या मिळणे अपेक्षित होतं. मात्र मोदी सरकारच्या काळात तसं झालं नाही. उलट सीएमआयच्या रिपोर्टनुसार दोन कोटी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, असा आरोप भुजबळ यांनी केला.
भुजबळ म्हणाले, तरुणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आजच्या तरुणावरती बिकट परिस्थीती आली आहे. मोदींमुळे लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मोदींचा एकच नारा ‘ना घर बसाऊंगा न बसने दूंगा’
पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत, हे सांगताना भुजबळ यांनी पेट्रोलच्या भावाची तुलना नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाशी केली आहे. महागाई वाढली आहे, यावर भुजबळ म्हणाले, “भाजपवाल्यांना नाव बदलण्याची सवय असून पुढे पेट्रोल हे केवळ एखाद्या बाटलीमध्येच बघायला मिळेल. त्याला भाजपवाले नाव देतील पंडित दीनदयाल उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ.”