शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना धक्का, आयकर विभागाने गोठवले खाते
Shiv Sena MP Bhavana Gawli | आयकर विभागाने 29 डिसेंबर रोजी भावना गवळी यांना नोटीस दिली होती. पाच तारखेला त्या संदर्भातील त्यांना मांडायचं होते. मात्र त्या प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिले होते. मात्र त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे समाधान झाले नाही.
विठ्ठल देशमुख, वाशिम, दि. 7 जानेवारी 2024 | शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर अनेक जणांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आल्या. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार राज्यात आहे. केंद्रात भाजपच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आहे. यावेळी खासदार भावना गवळी यांना धक्का देणारी कारवाई झाली आहे. खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहे. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना मोठा झटका मानला जात आहे.
8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स
आयकर विभागाने 29 डिसेंबर रोजी भावना गवळी यांना नोटीस दिली होती. पाच तारखेला त्या संदर्भातील त्यांना मांडायचं होते. मात्र त्या प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिले. होते. मात्र त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे समाधान झाले नाही. 8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्यासाठी अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली आहेत. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत 24 कोटी रुपयांचा अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरी गेले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी त्यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र या संदर्भातील इन्कम टॅक्स भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आयकर विभागाने ही नोटीस जारी केली होती.
आरोप-प्रत्यारोप सुरु
आयकर विभागाच्या कारवाईनंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. भावना गवळी या शिंदे गटाच्या खासदार आहेत. त्यांच्यावर आयकर विभागाची कारवाई झाल्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? याबाबत शंका आहे. दरम्यान या प्रकरणात पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले आहे की, आगामी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून भाजपला भावना गवळी नको आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.