नेता, अभिनेता, ‘एकच छंद गोपीचंद’; वाचा, कोण आहेत गोपीचंद पडळकर?
वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेले आमदार गोपीचंद पडळकर सध्या प्रचंड फॉर्मात आहेत. (actor and politician, know about bjp leader gopichand padalkar)
मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेले आमदार गोपीचंद पडळकर सध्या प्रचंड फॉर्मात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरील टीका असो की राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी रंगलेला कलगीतुरा असो… या ना त्या कारणाने पडळकर सतत चर्चेत असतात. अवघ्या काही महिन्यातच त्यांनी भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणून स्वत:ची इमेज तयार केली आहे. नेता, अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. कोण आहेत हे गोपीचंद पडळकर?, जाणून घेऊया त्यांच्या राजकारणाचा आलेख. (actor and politician, know about bjp leader gopichand padalkar)
थोडक्यात आढावा
धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. काही गोष्टींवरुन बिनसल्याने गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. गोपीचंद पडळकर यांनी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेला संधी दिली.
डॉक्टरांच्या वाडीतील नेता
सांगलीमधील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचं गाव. हा दुष्काळी भाग असला तरी या गावात 100 कुटुंबांमध्ये 40 डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टरांची वाडी म्हणूनही या गावाची ओळख आहे. पडळकरांच्या गावाची ओळख डॉक्टरांची वाडी असली तरी त्यांचे शिक्षण मात्र इयत्ता 12 वीपर्यंतच झालं आहे.
रासपमधून राजकारणास सुरुवात
गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीस महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून सुरुवात केली होती. जानकर हे धनगर समाजातील आहेत. त्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केला होता. त्याला पडळकरांनी बळ देण्याचं काम केलं. पडळकरांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद, तीनवेळा विधानसभा आणि एकवेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र, पाचही वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आता त्यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.
भाजप सोडली, भाजपमध्ये प्रवेश
त्यांनी पहिली निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. मात्र, नवा राजकीय चेहरा म्हणून ते चर्चेत आले होते. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना खानापूरमधून भाजपने तिकीट दिलं. पण त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, भाजपचे नेते संजय पाटील यांच्याशी वाद झाल्यानंतर पडळकरांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचितमधून त्यांनी सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांना 3 लाख 5 हजार मते मिळाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, पुन्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना थेट बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात तिकीट दिलं. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
एकच छंद, गोपीचंद
पडळकरांनी सांगलीतून वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढवली. धनगर समाजाचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांना पाहिलं जातं. सांगली लोकसभेच्यावेळी त्यांनी प्रचारसभा आणि रोडशोवर जोरदार भर दिला होता. त्यांची प्रचारसभेत एन्ट्री होताच ‘एकच छंद, गोपीचंद’चा जयघोष व्हायचा. त्यानंतर टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडायचा आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघायचं.
पडळकर आणि वाद
पडळकर आणि वाद हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही पवारांवर टीका केली होती. शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरूनही वाद निर्माण झाले होते.
भिडे गुरुजी आणि संघाशी संबंध
वंचितमधून लोकसभेची निवडणूक लढवत असताना पडळकर यांचे संघ आणि भिडे गुरुजींसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे ते भिडे गुरुजींचे हस्तक असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, पडळकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. संघाशी आणि भिडे गुरुजींसोबत आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सांगली जिल्ह्यातील नेत्यांचे भिडे यांच्याशी जसे संबंध आहे, तसाच आपला परिचय आहे. परंतु, त्यांच्या संघटनेशी काहीही देणंघेणं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांदीच्या वहाणा
गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आहेत. त्यांनी आमदार व्हावं म्हणून कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले होते. गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे यांनी 2006 पासून पायात चप्पल घातली नव्हती. तर नारायण पुजारी यांनी 2009 पासून चपला घातल्या नव्हत्या. मात्र, पडळकर आमदार होताच. या दोघांचा सत्कार करण्यात आला. या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी प्रदान करत पडळकर यांच्याकडून सन्मान करण्यात आला होता. तसेच, पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत, तोपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही, असं 2009 मध्ये म्हणणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांना पॅशन गाडी प्रदान करुन सन्मान करण्यात आला. (actor and politician, know about bjp leader gopichand padalkar)
पडळकरांची ‘धुमस’
पडळकर हे अत्यंत क्रिएटीव्ह नेते आहेत. ते नुसते राजकारणीच नाहीत तर लेखक आणि सिने निर्मातेही आहेत. त्यांनी सिनेमाचं लेखन करतानाच अभिनयही केला आहे. 2019मध्ये त्यांनी ‘धुमस’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात गोपीचंद पडळकर यांच्यासह अभिनेत्री साक्षी चौधरी, कृतिका गायकवाड, भारत गणेशपुरे आदी कलाकार होते. (actor and politician, know about bjp leader gopichand padalkar)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 14 April 2021 https://t.co/1CPUL9ycCe
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2021
संबंधित बातम्या:
कांशीराम यांच्यापासून प्रेरणा; महादेव जानकरांच्या तीन भीष्म प्रतिज्ञा; वाचा, कसा आहे राजकीय प्रवास!
पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीही, ‘मामांची कृपा?’; वाचा, कोण आहेत प्राजक्त तनपुरे?
प्राध्यापिका ते पहिल्या महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाडांची राजकीय भरारी!
(actor and politician, know about bjp leader gopichand padalkar)