राजू शेट्टींसाठी ‘जयकांत शिकरे’ कोल्हापूरच्या मैदानात!
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. राजू शेट्टी हे हातकणंगलेचे विद्यमान खासदार असून, हा लोकसभा मतदारसंघ शेट्टींचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी लोकवर्गणीतून राजू शेट्टींना प्रचारासाठी मदत केली जाते. मात्र, पराभवाची छायाही जवळपास नसावी म्हणून राजू शेट्टी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यातच आता […]
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. राजू शेट्टी हे हातकणंगलेचे विद्यमान खासदार असून, हा लोकसभा मतदारसंघ शेट्टींचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी लोकवर्गणीतून राजू शेट्टींना प्रचारासाठी मदत केली जाते. मात्र, पराभवाची छायाही जवळपास नसावी म्हणून राजू शेट्टी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यातच आता शेट्टींच्या मदतीसाठी थेट दाक्षिणात्य अभिनेता धावला आहे.
दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज हे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात सभा घेणार आहेत. येत्या 19 किंवा 20 एप्रिल रोजी अभिनेते प्रकाश राज राजू शेट्टींसाठी कोल्हापुरात सभा घेतील, अशी माहिती मिळते आहे.
कोण आहेत प्रकाश राज?
प्रकाश राज हे कन्नड, तामिळ, मल्याळम यांसह दक्षिण भारतातील विविध भाषांमधील सिनेमात काम करतात. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केले आहे. ‘सिंघम’ या हिंदी सिनेमातील ‘जयकांत शिकरे’ ही भूमिका प्रचंड गाजली. तसेच, सामाजिक कामांमध्येही प्रकाश राज मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. गेल्या काही वर्षांपासून ते राजकीय टीका-टिपण्णीही करतात. आपली भूमिका सोशल मीडिया किंवा जाहीर व्यासपीठावरुन मांडत असतात.
मोदी सरकारचे टीकाकार म्हणूनही प्रकाश राज यांची वेगळी ओळख गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झाली आहे. बंगळुरुमधून प्रकाश राज अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अत्यंत अभ्यासू अभिनेता म्हणून त्यांना सिनेसृष्टीत ओळखलं जातं.
हातकणंगलेचं राजकारण काय?
कोल्हापूर आणि सांगली अशा दोन जिल्ह्यात विस्तारलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पुन्हा रिंगणात आहे. राजू शेट्टींचा हा पारंपरिक मतदारसंघ असून, स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी लोकवर्गणी काढून लोक राजू शेट्टींना मदत करतात.
यंदा हातकणंगलेमधून शिवसेनेने धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. अगदी तरुण उमेदवार देऊन शिवसेनेने राजू शेट्टींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राजू शेट्टींचा जनसंपर्क पाहता, धैर्यशील माने हे किती तग धरुन राहतील, हा प्रश्नच आहे. त्यात राजू शेट्टी यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचीही साथ आहे. शिवाय, आता अभिनेते प्रकाश राज यांच्यासारखी लोकप्रिय व्यक्तीही राजू शेट्टींसाठी मैदानात उतरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कोल्हापुरात सभा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुले राजू शेट्टींचा विजय आणखी सोपा होणार असल्याचे एकूणच चित्र हातकणंगलेत आहे.