Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया
महायुतीकडून अखेर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती. साताऱ्यातील ही लढाई प्रतिष्ठेची आहे. उदयनराजे भोसले यांचा सामना शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे.
साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची चर्चा होती. अखेर आज मंगळवारी उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा सामना शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे. बारामतीप्रमाणे साताऱ्याची ही लढाई प्रतिष्ठेची असणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मीडियाशी संवाद साधला. “उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी 30 वर्ष लोकांची सेवा करतोय. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली” असं उदयनराजे भोसले म्हणाले.
तुम्हाला तिकीट मिळायला विलंब होत होता, वेगवेगळ्या पक्षाकडून ऑफर होत्या का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, “इथून तिथे हलण्याचा प्रश्न नाही. मी हवा आहे का? इथून तिथे हलायला. कोण काय बोलतय? कोण कुठल्या पद्धतीने विचार करतय, आपल्या पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढवावी असं वाटणं स्वाभाविक आहे”
काय म्हणाले उदयनराजे भोसले?
“आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. याआधी वेगवेगळ्या पक्षांची बरीच सरकारं येऊन गेलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत. विकासकामं सुरु आहेत. मी या ठिकाणी आवर्जुन उल्लेख करीन माझे मित्र पूर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली चांगली विकासकाम सुरु आहेत” असं उदयनराजे भोसले म्हणाले.