Sanjay Raut ED Raid : ईडीचे दिल्लीतील अधिकारी मुंबईत दाखल, ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेटींग, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला?; राऊतांना अटक होणार?
Sanjay Raut ED Raid : संजय राऊत यांचे वकील विकास साबणेही मैत्री बंगल्यात आले आहेत. साडेतीन तासानंतर साबणे मैत्री बंगल्यावर पोहोचले आहेत. तब्बल साडेतीन तासानंतर ते राऊतांच्या घरी आले आहेत.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यायांच्या घरावर ईडीने धाड मारली आहे. तब्बल साडेतीन तासापासून ईडीने राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी 7 वाजता राऊत यांच्या घरी आले. ते अजूनही राऊत यांच्या घरात कागदपत्रांची छाननी करत आहेत. तर दुसरीकडे राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी (shivsena) राऊत यांच्या घराच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे ईडीचे दिल्लीचे अधिकारीही (ED Team) मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयाभोवती मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक ईडी कार्यालयाबाहेरच्या हालचाली वाढल्याने राऊत यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर आज सकाळी 7 वाजताच ईडीचे अधिकारी पोहोचले. या अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच झाडाझडती सुरू केली आहे. साडेतीन तासांपासून ही चौकशी सुरू असतानाच अचानक दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयाभोवती हालचाली वाढल्या आहेत. ईडीचे दिल्लीतील अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी आल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या परिसरात साखळी आणि लॉक लाऊन गेट बंद करण्यात आला आहे. तसेच ईडी कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. यावरून राऊत यांना अटक होण्याची किंवा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राऊतांना ईडी कार्यालयात आणल्यास या परिसरात शिवसैनिकांकडून निदर्शने केली जाऊ शकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
परिसर निर्मनुष्य केला
या परिसरात रविवारी काही लोक रायडिंगसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात रविवारी थोडी वर्दळ असते. मात्र, राऊत यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने या परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळेच हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. तसेच रायडिंगला आलेल्या लोकांना परत पाठवून त्यांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
साडेतीन तासानंतर वकील आले
संजय राऊत यांचे वकील विकास साबणेही मैत्री बंगल्यात आले आहेत. साडेतीन तासानंतर साबणे मैत्री बंगल्यावर पोहोचले आहेत. तब्बल साडेतीन तासानंतर ते राऊतांच्या घरी आले आहेत. काही डॉक्युमेंटवर सही करायची असेल किंवा ईडीने पंचनामा केला असेल त्यासाठी मला बोलावलं असावं. आमचा अर्ज रेकॉर्डवर आहे. तो अंडरटेकिंग आहे. आमचा अर्ज ईडीने फेटाळला नाही. आम्ही सहकार्य करत आहोत. सहकार्य न करण्याचा प्रश्नच येत नाही. संसदेचं अधिवेशन सुरू होतं. म्हणून राऊत चौकशीला गेले नव्हते. त्यांनी वेळ मागवून घेतला होता, असं विकास साबणे यांनी सांगितलं.