Mask forced : कर्नाटकात पुन्हा एकदा मास्क सक्ती; महाराष्ट्रातही मास्क सक्ती होऊ शकते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत
देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण बनले आहे. सध्या दररोज राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क वापरावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाची (Coronavirus) भीती वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची वाढती प्रकरणे वाढली आहेत. दिल्लीसह हरियाणा, तामिळनाडू या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे दिल्लीसह अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा मास्क (Mask) घालण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्याचपार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने संभाव्य धोक्याची खबरदारी घेतली आहे. तसेच राज्यात पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मास्कची सक्ती केली आहे. तर महाराष्ट्राचीही चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे सध्या राज्यात नसलेली मास्क बंदी पुन्हा एकदा होऊ शकते असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. ते बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते
देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण बनले आहे. सध्या दररोज राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क वापरावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. याच्याआधी गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मास्क बंदी मागे घेण्यात आली होती. मात्र आता पुन्हा रूग्ण सापडत आहेत. त्यात नागरिक मात्र मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. असे होऊ नये म्हणून राज्यातही कदाचित पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते. याबाबतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळ्यात संकेत दिले आहेत.
कर्नाटकात मास्कची सक्ती
दरम्यान देशात वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमिवर कर्नाटक शासनाने राज्यात पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मास्कची सक्ती केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे.
सामाजिक अंतर राखावे
त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी, प्रत्येकाने सामाजिक अंतर राखावे असे आवाहनही करण्यात आले आहे. या संदर्भाचा आदेश राज्याचे मुख्य सचिव पी.रवी कुमार यांनी आज सोमवारी सायंकाळी जारी केला आहे. जारी करण्यात आलेल्या आदेशाचे नियमभंग करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.