Narayan Rane : वक्त आने दो, जबाब भी देंगे और…कणकवलीत राणेंना कोणी दिला इशारा? VIDEO
Narayan Rane : कणकवलीत एक बॅनर लागलाय. त्याची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चा आहे. राणेंना इशारा देण्याचा हा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिलं जातय. लोकसभेची निवडणूक राणेंनी जिंकली. पण आता या मतदारसंघात कशावरुन कुरबुरी सुरु झाल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जायचा. पण मागच्या 10 वर्षात सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे गटाचे आमदार-खासदार निवडून आले. त्यांचं वर्चस्व निर्माण झालं. पण आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गावर राणेंची पकड घट्ट होत आहे. नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातून खासदार बनले. कोकणच्या जनतेने पुन्हा एकदा राणेंवर विश्वास दाखवला. लोकसभेची निवडणूक राणेंनी जिंकली. पण आता या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यातूनच ही बॅनरबाजी झालीय.
कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी? याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो आहे. या बॅनरवरील मजकूर हा आक्षेपाचा विषय ठरु शकतो. ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असा मजकूर या बॅनरवर आहे. त्यावरुनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सामंत बंधुंवर आरोप झाले होते. लोकसभेत विजय मिळवूनही शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील वादाच कारण काय? ते जाणून घ्या.
वादाची ठिणगी कशावरुन?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा परंपरागत शिवसेनेचा लोकसभा मतदारसंघ आहे. शिवसेना एकसंध असताना नेहमीच ही जागा शिवसेनेने लढवली आहे. मागच्या 10 वर्षांपासून विनायक राऊत इथून खासदार होते. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपाने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होतं. पण ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गटातील मंत्री उदय सामंत इच्छुक होते. त्यांचे बंधु किरण सामंत लोकसभेसाठी आग्रही होते.
पण महायुतीमध्ये अखेर ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली. किरण सामंत यांची नाराजी देखील त्यावरुन अनेकदा समोर आली. लोकसभा निवडणुकीच्या निकालात नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आघाडी मिळाली. त्यावरच त्यांनी निवडणूक जिंकली. पण उदय सामंत यांचं वर्चस्व असलेल्या रत्नागिरीतून आघाडी मिळू शकली नाही. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरु झाल्या.