Eknath Shinde : मुंबईनंतर आता पुणे, औरंगाबादमध्येही होणार शिवसेना भवन, शिंदे गटाचे लक्ष मुख्य शहरांवर
शिवसेना भवनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शिंदे गटाचा उद्देश असला तरी याला वेगळेच स्वरुप येत आहे. मुंबईत प्रति शिवसेना कार्यालय उभारले जाणार अशी चर्चा सुरु होताच राज्यातील पुणे, औरंगाबाद, ठाणे यासारख्या प्रमुख शहरांमध्येही उभारणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे : (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आता पुढचे पाऊल टाकत (Eknath Shinde) शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या हालचालींना वेग येत आहे. मुंबई येथे शिवसेना भवन उभारण्याची चर्चा सुरु असतानाच खा. राहुल शेवाळे यांनी शिंदे गटाचे पहिले कार्यालय हे मुंबईतील मानखुर्दमध्ये सुरु केले आहे. हे (Shiv Sena Bhawan) शिवसेनेचे कार्यालय असले तरी येथी बॅनरवरुन पक्षप्रममुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यालय उभारणीला आता वेग येत असून मुंबईपाठोपाठ पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यामध्ये शिवसेना कार्यालय थाटण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या पहिली शाखा मानखुर्द महाराष्ट्र नगर मध्ये खासदार राहुल शिवाळे शिवसेना लोकसभा गटनेता यांचे हस्ते सुरु करण्यात आली आहे. यानंतर आता पुण्यातही शिवसेना भवन उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर मराठवाड्यातील औरंगाबाद येथेही हे भवन उभारले जाणार आहे.
पुण्यात बालगंधर्व चौकात शिवसेना भवन
शिवसेना भवनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शिंदे गटाचा उद्देश असला तरी याला वेगळेच स्वरुप येत आहे. मुंबईत प्रति शिवसेना कार्यालय उभारले जाणार अशी चर्चा सुरु होताच राज्यातील पुणे, औरंगाबाद, ठाणे यासारख्या प्रमुख शहरांमध्येही उभारणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात तर शहराच्या मध्यवर्ती भागात बालगंधर्व चौकात सेना भवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यावेळी शिंदेगटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, आणि सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी नव्या कार्यलयाची पाहणी केली. तर ठाणे आणि दादरमध्येही कार्यालय होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही
एकीकडे शिंदे गटात इनकमिंग वाढत आहे तर दुसरीकडे संघटनात्मक बदल हे सुरु आहेत. गटाला पक्षाचे रुप यावे त्याअनुशंगाने सर्वतोपरी तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे. आता शिवसेना भवन उभारण्याची जणूकाही स्पर्धाच सुरु झाली असे चित्र आहे. पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यातील सेना भवनचे उदघाटन करण्यात येईल अशी माहिती प्रमोद भानगिरे यांनी दिलीय. या सेना भवनच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्याया योजना सर्व सामान्यपर्यंत पोहचवल्या जातील असं यावेळी शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
मानखुर्दच्या शाखेतील बॅनरवरुन सर्वकाही स्पष्ट
शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघात मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले आहे. विशेष म्हणजे राहुल शेवाळेंनी उद्धाटन केलेल्या शाखेवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो नाहीत. मुंबई शहरातील ही पहिलीच शाखा असून मुंबईत शहरातला हा पहिलाच वार्ड येतो. शहरात इथूनच प्रवेश होतो. याठिकाणी पहिल्या शाखेचे उद्धाटन होतंय त्याचा आनंद होत असल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.