Raj Thackeray : ‘नगरसेवक चोरांना त्याग या….’, राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसेचा कोणावर हल्लाबोल?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? मनसे महायुतीसोबत जाणार का? मनसे लोकसभेच्या किती जागा लढवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर कालच्या सभेतून मिळाली. राज यांनी आपल्या ठाकरी शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल गुढी पाडवा मेळावा पार पडला. दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र सैनिक या भव्य मेळाव्याचे साक्षीदार ठरले. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाने उपस्थित जनसमूहाला जिंकून घेतलं. दरवर्षी मनसेचा गुढी पाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानात संपन्न होतो. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र सैनिक शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले होते. मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा खास होता. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? मनसे महायुतीसोबत जाणार का? मनसे लोकसभेच्या किती जागा लढवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर कालच्या सभेतून मिळाली. राज यांनी आपल्या ठाकरी शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. त्याचवेळी मनसेची लोकसभा निवडणुकीसाठी भूमिका काय असेल? ते सुद्धा जाहीर केलं.
राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. देशाची भविष्य घडवणारी ही लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा जाहीर केला. बदलत्यात कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको, असं त्यांनी महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट केलं.
स्वतःच्या भावाच्या ताटातलं ओरबाडून खाणाऱ्यांना (नगरसेवक चोरांना )त्याग या शब्दाचा अर्थ काय समजणार ???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 10, 2024
…म्हणून नगरसेवक चोर शब्द वापरला
राज ठाकरे यांचं महायुतीला पाठिंबा जाहीर करण महाविकास आघाडीला चांगलच झोंबणार आहे. राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे गट, काँग्रेसकडून टीका सुरु झाली आहे. “वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. वाघाची शेळी झाली. शेळी गवत खाईल असे राज ठाकरे यांचे भाजपमध्ये जाऊन होऊ नये” अशी टीका काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आता मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी टि्वट केलय. “स्वतःच्या भावाच्या ताटातलं ओरबाडून खाणाऱ्यांना (नगरसेवक चोरांना )त्याग या शब्दाचा अर्थ काय समजणार ???” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना एकसंध असताना त्यांनी मनसेचे महापालिकेतील नगरसेवक फोडले होते. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक चोर शब्द वापरला आहे.