ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा पर्याय दिल्यानंतर शिंदे गटाचीही 3 चिन्हांवर चर्चा
अंधेरी निवडणुकीपर्यंत तात्पुरतं चिन्ह वापरलं जावं, पण धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आपल्यालाच मिळावं यासाठी शिंदे गट प्रयत्न करणार आहे.
मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. तसेच चिन्ह निवडीबाबतही विचार केला जात आहे. ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा पर्याय दिल्यानंतर शिंदे गटाचीही 3 चिन्हांवर चर्चा सुरु केली आहे.
वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष चिन्ह आणि नावासंबंधित सगळे अधिकार आमदार आणि मंत्र्यांनी पक्ष कार्यकारणीला दिले आहेत. मुख्य नेते एकनाथ शिंदे, नेते आणि ऊपनेत्यांची कार्यकारणी बसून निवडणुक चिन्ह आणि नाव ठरवणार आहे.
अंधेरी निवडणुकीपर्यंत तात्पुरतं चिन्ह वापरलं जावं, पण धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आपल्यालाच मिळावं यासाठी शिंदे गट प्रयत्न करणार आहे.
शिंदे गटाची 3 चिन्हांवर चर्चा झाल्याचे समजते. गदा, तलवार आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत शिंदे गटाकडून चर्चा सुरु असल्याचे समजते.
ठाकरे गटाने पक्षासाठी 3 नावं आणि चिन्हाबाबत 3 पर्याय ठरवले
ठाकरे गटाने पक्षासाठी 3 नावं आणि चिन्हाबाबत 3 पर्याय ठरवले आहेत. या संदर्भात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत चिन्हांबाबत माहिती दिली.
ठाकरे गटाकडून पक्षाची 3 नावं आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 नावं ठाकरे गटाने पाठवली आहेत.
ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत 3 पर्याय देखील सुचवण्यात आले आहेत. त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे.