मतदानाला दोन दिवस उरले, पालघरमध्ये आगरी सेनेचा शिवसेनेला दणका
पालघर : पालघरमध्ये दोनच दिवसात म्हणजे 29 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. काँग्रेसमधून भाजपममध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार असून, विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव उभे ठाकले आहेत. दोन दिवसांवर मतदान असतानाच, शिवसेनेला पालघरमध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला फायदेशीर ठरणाऱ्या आगरी सेनेत उभी फूट पडली आहे. आगरी सेनेचे […]
पालघर : पालघरमध्ये दोनच दिवसात म्हणजे 29 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. काँग्रेसमधून भाजपममध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार असून, विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव उभे ठाकले आहेत. दोन दिवसांवर मतदान असतानाच, शिवसेनेला पालघरमध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला फायदेशीर ठरणाऱ्या आगरी सेनेत उभी फूट पडली आहे. आगरी सेनेचे पालघर तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी बंडखोरी करत, बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पालघरमधील निवडणुकीला आता रंगत आली आहे.
पालघर तालुका आगरी सेनेतर्फे केळवे येथे मार्गदर्शन शिबराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा न देता बंडखोरी करत महाआघाडी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेला याचा अनपेक्षित फटका बसणार आहे.
आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाराम साळवी यांनी काही दिवसांपूर्वी पालघर लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र तालुका पातळीवरील आगरी सेनेत फाटाफूट झाल्याने याचा थेट फायदा महाआघाडीला होणार हे निश्चित झाले आहे. आगरी सेना नेहमीच शिवसेनेच्या विरोधात राहिली आहे, असेही तालुकाध्यक्ष यांनी म्हटले आहे. त्यांनी बंडखोरी केल्याने पालघर तालुक्यातील आगरी मते ही राजेंद्र गावित यांच्या विरोधी जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीला पाठिंबा देताना आम्हा नेत्यांना विश्वासात न घेता पाठिंबा जाहीर केल्याने या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक असलेले आणि आगरी सेनेचे कार्याध्यक्ष चंदूलाल घरत यांनी नाराजी व्यक्त केली.
पालघरमध्ये यंदा तिकीट वाटपापासूनच निवडणुकीला रंग चढला होता. महायुतीत पालघरच्या जागेसाठी शिवसेना अडून बसली होती. मात्र, पालघरमध्ये राजेंद्र गावित यांच्या रुपाने भाजपचा विद्यमान खासदार होता. मात्र, दोन्ही पक्षांनी समजुतीने मार्ग काढला. काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल होत, पुन्हा एकदा राजेंद्र गावितांना महायुतीने तिकीट दिलं. तर विरोधात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. हितेंद्र ठाकूर यांचे पालघरमध्ये वर्चस्व असल्याने राजेंद्र गावित यांना मोठं आव्हान आहे.