परभणी: पुढचा मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजपचाच (bjp) असेल असं विधान शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी काल केलं. शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं ठोस म्हटलं नाही. पण कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मात्र आपली मन की बात जाहीर केली आहे. पुढचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहावेत अशी माझी इच्छा आहे, असं अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी म्हटलं आहे. परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात वाद सुरू आहेत. त्यावरही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सरकारमध्ये सगळं वेल अँड गुड आहे. मोठा परिवार आहे. त्यामुळे छोट्या फार गोष्टी होत असतात. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सरकारला अजिबात धोका नाही. शिवाय हे प्रकरण हाताळण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. पुढचे दोन वर्षे हेच मुख्यमंत्री राहतील. माझी तर इच्छा आहे की पुढेही हेच मुख्यमंत्री असावेत, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे चित्रं छापण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसासाठी दैवत आहे. मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे. माझ्या हातात असतं तर नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याची मी लगेच ऑर्डर काढली असती, असं ते म्हणाले. त्यामुळे सत्तार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला काय? अशी चर्चा जोरदार रंगली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अब्दुल सत्तार अण्णांचं मंत्रीपद काढून त्यांना बिन खात्याचे मंत्री करावं, अशी मागणी केली आहे. त्यावर, अमोल काय एवढा मोठा नाही की आपण इतक्या लोकांत त्याची चर्चा करावी. कोणाला टीव्हीवर येण्यासाठी काही बोलावे लागते त्याचाच हा एक भाग आहे. राहिला विषय अमोल याच्याबद्दल ते काय बोलले हे मला माहीत आहे, मात्र हे बोलणं उचित होणार नाही. नाहीतर मला कोणाचं काय करायचं हे चांगलं माहीत आहे, असा इशारा त्यांनी दिला.
रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही आमदारांचे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, त्यासाठी ते स्वतंत्र आहेत. मात्र माझी दोघांनाही विनंती आहे की, सरकारमध्ये असताना दोघांनी भांडण करू नये. राज्याच्या विकासासाठी काय करता येईल हे दोघांनी पहावं, असं ते म्हणाले.
या देशात कोणाकडे खासदार किती आहेत त्यावर पंतप्रधान ठरवत असतो. त्यामुळे त्यांनी आधी तेवढे खासदार निवडून आणावेत आणि करावा त्यांचा पंतप्रधान, असं ते म्हणाले. एमआयएमचे नेते ओवैसी यांनी मला हिजाब घातलेली मुलगी पंतप्रधान झालेली पाहायची आहे, असं म्हटलं होतं. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांनी हे उत्तर दिलं.