विखे पाटील यांचं टेन्शन वाढवणारी बातमी, राम शिंदे यांचं मोठं विधान, नगर जिल्ह्यात शीतयुद्धाच्या चर्चांना उधाण

| Updated on: Apr 18, 2023 | 6:19 PM

अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात भाजपच्या गोटात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भाजप आमदार राम शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे खासदार सुजय विखे पाटील यांचं आणि त्यांच्या वडिलांचं टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विखे पाटील यांचं टेन्शन वाढवणारी बातमी, राम शिंदे यांचं मोठं विधान, नगर जिल्ह्यात शीतयुद्धाच्या चर्चांना उधाण
Follow us on

अहमदनगर : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. राज्यात नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात आता चांगलंच राजकारण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच गोटातील दोन बड्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगतं की काय? असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण भाजप आमदार राम शिंदे यांनी आज एक मोठं विधान केलं आहे.

भाजप आमदार राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची इच्छा व्यक्त केली आहे. पण राम शिंदे यांनी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे राम शिंदे यांची ही इच्छा भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव खासदार सुजख विखे पाटील यांचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण सध्या नगर जिल्ह्यात सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभेचं तिकीट मिळणार की नाही?

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण काँग्रेस पक्षातच असणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी भाजपकडून सुजय विखे यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलेलं. भाजपने दिलेल्या संधीचं सोनं करत सुजय विखे पाटील या निवडणुकीत जिंकूनही आले. पण आता त्यांना पुन्हा भाजपकडून खासदारकीचं तिकीट मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राम शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त केली आहे.

राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतामा राम शिंदे हे मंत्री होते. शिंदे यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. पण तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली. असं असताना आता राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये आता आगामी काळात भाजपमध्येत शीतयुद्ध रंगण्याची चिन्हं आहेत. अर्थात भाजप पक्ष काय निर्णय घेतो ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राम शिंदे नेमकं काय म्हणाले?

“ज्या वेळेला मी मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हाच अनेकांनी मी लोकसभेला उभे राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेला मी कोणतीही भूमिका घेतली नाही. तर मी विधानसभा ही लढणार असलो तरी मी मनाची तयारी ठेवली आहे की लोकसभा ही लढवायची. मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्यामुळे यावेळी पूर्ण एक वर्ष आधीच लोकसभेसाठी तयारीत आहे”, असं मोठं विधान राम शिंदे यांनी केलं.

‘आधी विखे, नंतर एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांचा नंबर’

राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंजावाता इतका आहे की त्यांच्या कालावधीत जो जो विरोधी पक्षनेता झाला तो त्यांच्या बरोबर आला. पहिले राधाकृष्ण विखे पाटील, नंतर एकनाथ शिंदे आले आणि आता अजित पवारांचा तिसरा नंबर”, असं राम शिंदे म्हणाले.

“अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांनी सांगितलं आहे, की बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही. ज्यावेळी अशा पद्धतीच्या खुमस लोक दाखवतात त्यात कुठेतरी तथ्य असते. मात्र त्यांनी जरी तथ्य नाही असं म्हटलं असलं तरी हे सांगायला एवढा वेळ का लागला?” असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.

“अजित पवार यांनी जरी भाजपसोबत जाणार नाही, असं म्हटलं असलं तरी लोकांच्या मनात काही ना काही प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. त्यांचं उत्तर मिळालेलं नाही, असं राम शिंदे म्हणाले. तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जी प्रतिक्रिया आली ती सरळ नव्हती असं माझं मत आहे”, अशी भूमिका राम शिंदे यांनी मांडली.