संजय राऊत आमच्या दृष्टीने बेदखल व्यक्तिमत्व; कुणी डागलं टीकास्त्र
Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut : शरद पवार, संजय राऊत अन् महाविकास आघाडीवर भाजपच्या मंत्र्याचं टीकास्त्र
अहमदनगर : राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत आमच्या दृष्टीने बेदखल व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी फारसं काही बोलणार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. तर काँग्रेसचे 137 उमेदवार निवडून आले. यावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचा निकाल आला म्हणजे महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली असं म्हणण्यात अर्थ नाही. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची अवस्था मागच्या आठवड्यात सगळ्यांनी पाहिली आहे. वज्रमूठ सभेला मोठे तडे गेले आहेत आणि ते एकमेकांवरच मूठ चालवत आहेत, असं ते म्हणालेत.
कर्नाटक निकालानंतर पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणारे कोण आहेत? विनाकारण महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांचा पक्ष राहिला नाही आमदार खासदार राहिला नाही अशांनी आरोप करू नये. वैफल्यग्रस्त झाल्याने ठाकरे गटाकडून अशा आरोप केले जातात, असंही विखे पाटील म्हणालेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिव्हर ओक या निवासस्थानी काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. याला उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार यांच्यासह इतर मविआचे नेते उपस्थित होते. यावरही विखे पाटील बोललेत. मोठा आशावाद घेऊन शरद पवारांच्या पक्षाने कर्नाटक निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या उमेदवारांचं डिपॉडिट जप्त झालं. मविआमध्ये एकवाक्यता आढळत नाही, असं विखे पाटील म्हणालेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगावमधील अकोला हिंसाचारावरही भाष्य केलंय. शेवगावचा प्रकार दुर्दैवी आहे. प्रार्थनास्थळात दगड आणि शस्त्र आणून ठेवण्याची प्राथमिक माहिती मला मिळाली आहे. यापूर्वी हनुमान जयंती आणि आता धर्मवीर संभाजीराजे जयंती काही लोक विघ्न आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडतात त्या पोलीस निरीक्षकावर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. या घटनेमागे जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर मोक्कासह कडक कारवाई केली जाईल, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.