अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघात केलाय. उद्धव ठाकरे गटाचे दरवाजे बंद झालेत आणि शिंदे गटातून ते निवडून येवू शकत नाहीत. त्यामुळे सर्वांची इच्छा असेल की कमळाच्या चिन्हावर लढावी. काम न करता मोदींच्या लाटेत निवडून येऊ, असं अनेकांना वाटतंय. पण लाट एकदा, दोनदा येते पण तिसऱ्यांदा ती येईलच असं नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
मला लॉंच करण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी 2019 ला इथला लोकप्रतिनिधी झालोय. जे बोलघेवडे आणि चॉकलेट बॉय आहेत. ते स्वतः चं सरकार आलं की गप्प बसायचे. थोर व्यक्तींचा अपमान झाला, MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर गप्प बसतात.थोर व्यक्तींनी महान कार्य केलेले असते. त्यामुळं ते महान असतात.दिल्लीत दोन महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही सावरकरांची जयंती साजरी केली गेली तरी हे गप्प आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
नुसतं भाषण करून, टाळ्या वाजवून लोकांचे प्रश्न सुटत नसतात. धनगर समाजाचे प्रश्न भापकेबाजी करून आणि मंत्रिपद मिळावं म्हणून केले तर लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. भापजपने छोटे नेते तयार केलेत जे इतर पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर बोलतात. भाजपचे मोठे नेते या छोट्या नेत्यांना काही बोलत नाहीत. याचा अर्थ या नेत्यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.
विधानसभा अध्यक्ष संविधानाच्या बाजूने निर्णय घेणार असतील तर 16 लोकांना त्यांना अपात्र करावंच लागेल, असं म्हणत 16 आमदारांच्या अपात्रतेवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. व्यक्ती समोर नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा दावा करत छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शिरसाट यांनी क्लीन चिट दिलीय. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत एका आमदाराने गोळीबार केला त्यांना क्लीन चीट मिळाली. महिला नेत्याला खालच्या पातळीवर बोलले. त्यांना क्लीन चिट मिळाली. सुप्रियाताईंवर एक मंत्री बोलले पण सरकारने त्याबाबत काहीही केलं नाही. सरकारला स्वतःच्या अजेंड्याचं पडलेलं आहे. ही क्लीन चीट स्वतःच्या विचाराला आणि अहंकाराला मनात ठेवून दिली तरी काही फरक पडणार नाही. 2024 ला सरकार बदलल्यावर या लोकांचं काय करायचे, निर्णय कसे करायचे ते आम्ही ठरवू, असं रोहित पवार म्हणालेत.
काही लोक चौन्डी इथल्या नियोजनाच्या बाबतीत राजकीय वक्तव्य करत आहेत. आम्ही समाजकारण करतोय. मात्र जे राजकारण करत आहेत, त्यांच्या बाबतीत ते बोलले असावेत. महापुरुष हे जातीपतीसाठी कार्य करत नसतात तर समाजासाठी माणुसकी म्हणून करतात, असंही रोहित पवार म्हणालेत.