NCP: सोलापुरात एमआयएमला खिंडार; सहा नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार
NCP: तौफिक शेख हे सोलापूरमधील एमआयएमचे मातब्बर नेते असून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या (corporation) तोंडावर एमआयएमला (mim) मोठं खिंडार पडलं आहे. सोलापुरातील एमआयएमचे सहा नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश करणार आहेत. एमआयएमचे नेते, नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सहा नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे तौफिक शेख हे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिस्पर्धक आहेत. त्यामुळे शेख यांना पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीने एमआयएमला खिंडार पाडतानाच काँग्रेसलाही शह दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस आता राष्ट्रवादीच्या या खेळीला कसे उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी जयंत पाटलांच्या उपस्थितीत एमआयएमचे 6 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सोलापुरात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे नेते आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत 6 नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
प्रणिती शिंदेंना कडवे आव्हान
तौफिक शेख हे सोलापूरमधील एमआयएमचे मातब्बर नेते असून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. शेख यांच्यासह शेकडो समर्थक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
एमआयएमकडे उरले दोन नगरसेवक
दरम्यान, सोलापूर महापालिकेत एमआयएमचे आठ नगरसेवक आहेत. त्यातील सहा नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एमआयएममध्ये फक्त दोनच नगरसेवक उरणार आहेत. त्यामुळे एमआयएमसमोर मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे.
पालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप 49 शिवसेना 21 काँग्रेस 14 राष्ट्रवादी 04 MIM – 08 माकप – 01 अपक्ष/इतर – 04 रिक्त – 01 एकूण = 102