मुस्लिम आरक्षणासाठी अधिवेशन काळात विधानसभेबाहेर धरणं आंदोलन, इम्तियाज जलील यांचा इशारा
इम्तियाज जलील आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली. इतकंच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाचा इशाराच यावेळी जलील यांनी दिलाय.
मुंबई : मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वात आज एमआयएमकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी इम्तियाज जलील आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली. इतकंच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाचा इशाराच यावेळी जलील यांनी दिलाय.
वक्फ बोर्डाची 93 हजार एकर जमीन कुठे आहे?
कुठे आहे 93 हजार एकर जमीन? कुणी कुणाला वाटली, कुणी कुणाला विकली? 8 महिने झाले मला महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा सदस्य होऊन. या काळात 9 एफआयआर दाखल केले आहेत. जे विचार करत होते की आम्हाला कोण रोखू शकतं. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो. त्यांना काय माहिती बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही. बाजारात सिंह विकले जात नाहीत, त्यातील एक स्टेजवर आहे, असं सांगत जलील यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय.
LIVE from Tiranga Rally at Chandivali Ground, Mumbai, Maharashtra.#ChaloMumbai #TirangaRally https://t.co/mddn2UbUKc
— AIMIM (@aimim_national) December 11, 2021
मुंबई… लो मै आ गया
‘त्यांना वाटलं होतं सरकार आमचं आहे, आम्ही काहीही करु शकतो. मी समजत होतो जनता माझी आहे मी काहीही करु शकतो. त्यांनी पूर्ण ताकद लावली, की मी इथं पोहोचू नये. मी ही पूर्ण ताकद लावली. त्यामुळेच म्हणतोय, मुंबई… लो मै आ गया. मला माहिती आहे की, ज्या प्रकारे अडवण्यात आलं त्यात पोलिसांचा हात नव्हता. ते आपलं काम करत होते. पण ते कोण लोक होते ज्यांना आम्ही मुंबईत यायला नको होतं. ही रॅली आयोजित केली तेव्हा आम्ही स्पष्ट केलं होतं की ही एका पक्षाची रॅली नसेल. आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आता शिवसेनाही मुस्लिमांबाबत बोलतेय, त्यांच्या मुस्लिम नेत्यांनाही बोललो होतो. मराठा आंदोलनातून एक गोष्ट शिकायला हवी. मराठा बांधव कुठला पक्ष म्हणून रस्त्यावर उतरला नाही. आम्हीही सर्व पक्षातील मुस्लिम नेत्यांना दाखला देत विनवणी केली. पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही’, अशी खंत जलिल यांनी व्यक्त केलीय.
सत्ताधारी महाविकास आघाडीला सवाल
उच्च न्यायालयाचा निर्णय येऊनही हे सरकार आम्हाला आरक्षण का देत नाहीत? 2014 ते 2019 पर्यंत मी विधानसभेत होतो तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचे नेते मुस्लिम आरक्षणासाठी भाषणं देत होते, प्रश्न विचार होते. पण 2019 नंतर सत्ताबदल झाला. आता तेच सत्तेत आले आहेत. विरोधात होते तेव्हा भाजपला मागत होते, त्यांना मुस्लिमांशी काही देणंघेणं नव्हतं. पण आता सत्तेत तुम्ही आहात, तुम्हाला तिथे पोहोचवण्यात आम्हा मुस्लिमांचाही हात आहे. पण सत्तेत आल्यानंतर विचार बदलला. आम्ही वाट पाहिली, पण नाही. आता आम्ही घोषणा केली की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येतोय. तेव्हा त्यांनी पोलिसांना पुढे केलं. सरकार हमसे डरती है, इसलिए पुलिस को आगे करती है… आम्ही येऊ नये म्हणून कोण खेळ खेळत होतं हे माहिती आहे, अशी टीकाही जलिल यांनी केलीय.
इतर बातम्या :