Ajit Pawar : ‘कुणाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य करु नका’ अजितदादांनी टोचले अमोल मिटकरींचे कान; जातीय सलोखा ठेवण्याचा सल्ला
मिटकरी यांनी इस्लामपुरातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाज दुखावला गेला. त्यावरुन राज्यात मोठं राजकारण पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार मिटकरींचं नाव न घेता म्हणाले की, कुणाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य करु नका, मलाही झटका बसला आहे.
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीवादाचा गंभीर आरोप केलाय. तसंच शरद पवार हे ब्राह्मण विरोधी असल्याचा आरोपही केला जातो. अशावेळी शरद पवार यांनी आज पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक घेत त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे बुलडाण्यातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याच पक्षातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचे कान टोचले. मिटकरी यांनी इस्लामपुरातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाज दुखावला गेला. त्यावरुन राज्यात मोठं राजकारण पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार मिटकरींचं नाव न घेता म्हणाले की, कुणाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य करु नका, मलाही झटका बसला आहे. जळगावच्या जामोदमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्पसभा पार पडली. त्यावेळी अजित पवार, एकनाथ खडसे, अमोल मिटकरी आदी नेते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, काहीजण जाणीवपूर्वक आमची बदनामी करत असतात की हे पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप देतात. राज्य गतीने पुढे कसं जाईल, राज्याचा विकास कसा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. राज्य सरकार कमी पडले म्हणून विरोधकांनी कांगावा केला. इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरु आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आरक्षण कोर्टाला मागू.
‘नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही’
काही लोक लोकांच्या भावनांशी खेळतात. लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. विदर्भ, मराठवाड्यात अधिक दौरे आपण करु. कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य कुणीही करु नये. मलाही झटका बसला होता, असं सांगत अजित पवार यांनी एकप्रकारे अमोल मिटकरी यांचं नाव न घेता त्यांना सल्ला दिलाय. काही लोक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतात. पण जे जगात कुठेही टिकले नाहीत. जातीय सलोखा आपल्यालाच ठेवावा लागेल. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही, असंही अजितदादा म्हणाले.
‘खरिपाच्या तयारीला लागा, आम्ही कमी पडू देणार नाही’
नियमित दोन खाल कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार सानुग्रह निधी देणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केलीय. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करावी. आम्ही काही कमी पडू देणार नाही, काळ्या आईची सेवा करा, असं आवाहनही अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे.