‘काही जित्राबं लय वाईट असतात’, अजित पवारांच्या सडेतोडपणाचे 8 पुरावे, वाचा सविस्तर
आज बारामतीमध्ये जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकल्पाला रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाऊंडेशनकरुन पाईपलाईनसाठी मदत करण्यात आली आहे. यावेळी वढाणे ग्रामस्थांच्या वतीनं अजित पवार यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्या खुमासदार आणि आक्रमक भाषणशैलीचा प्रत्यय आला.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला आक्रमक स्वभाव, रोखठोक मतं, सडेतोड उत्तर देण्याची पद्धत आणि एखाद्याला दरडावण्याची स्टाईल यामुळे प्रचलित आहे. जे मनात तेच तोंडावर असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. मात्र त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या लोकप्रियतेचं खरं गमक आहे. आज बारामतीमध्ये जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकल्पाला रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाऊंडेशनकरुन पाईपलाईनसाठी मदत करण्यात आली आहे. यावेळी वढाणे ग्रामस्थांच्या वतीनं अजित पवार यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्या खुमासदार आणि आक्रमक भाषणशैलीचा प्रत्यय आला. (BhumiPujan of Janai Right Canal Pipeline by Deputy CM Ajit Pawar)
जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामांची उजळणी केली. 1967 सालापासून शरद पवार यांनी पाणी प्रश्नावर काम केलं. बारामती हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या होती. विविध भागात असलेली पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तलावांची कामं मार्गी लावली. अनेकजणांना या कामांसाठी गळ घातली. काहीजण दिवसा हो म्हणायचे आणि रात्री बदलायचे. कुणीतरी तिथं बोटं घालायचं काम करत होतं. अनेकांनी कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचं अजित पवार म्हणाले.
‘काही जित्राबं लय वाईट असतात’
कोरोना काळ असला तरी लोकांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. काही जित्राबं लय वाईट असतात. आता कालव्याला दोन महिने पाणी आलं नाही तरी पाण्यासाठी भटकंती होऊ नये अशा प्रकारची योजना आखली आहे. जिरायती भागासह तालुक्याच्या विविध भागात पाण्याच्या योजना राबवल्या आहेत. राज्याची आर्थिक स्थिती घरसली आहे. पण तरीही विकासकामं थांबू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामं करायची झाली तर जमिनी जातात. जमिनी दिल्या म्हणून कामं मार्गी लागतात. पण त्याचा मोबदलाही चांगला दिला जाईल. कुणीतरी दलाल आला तर त्याला जमिनी विकू नका. जमिनी घेताना सरकार चार पट दर देतं. तुमच्या जमिनी जात असतील तर त्याचे पैसे मिळतील. विकास करायचा असेल तर थोडं सोसावं लागेल, असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी नागरिकांना केलं.
‘कुटुंब मर्यादित ठेवा, उगाच फलटण नको’
येताना हरणं दिसली. पण कुणी मारायला जाऊ नका, नाहीतर चक्की पिसिंग अन पिसिंग… कुटुंब मर्यादित ठेवा, उगाच फलटण निर्माण करु नका. दोनवरच थांबा, अशा शब्दात कुटुंब नियोजनाचं आवाहनही अजिदादांनी केलंय.
सकाळी 6 वाजता काम सुरु करतो
मी सकाळी 6 वाजता काम सुरु करतो. तेव्हा काहीजण घोरत असतात. काही सुर्यमुखी तर साखरझोपेत असतात. असा टोलाही अजित पवार यांनी आपल्या उशिरा उठणाऱ्या सहकाऱ्यांना आणि विरोधकांना लगावला आहे.
अनेकजण कोट्याधीश मात्र, ते चहासुद्धा दुसऱ्याचा घेतात!
माणसाकडे पैसा असला तरी देण्याची दानत असावी लागते. अनेकजण कोट्याधीश मात्र, ते चहादेखील दुसऱ्यांना पाजायला लावतात. काहीजण श्रीमंत नसले तरी आपला परीनं मदत करतात. शोभा धारीवाल यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांच्या विविध सामाजिक कामांमध्ये सहकार्य केलं जात आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी धारीवाल यांचं कौतुक केलंय. (BhumiPujan of Janai Right Canal Pipeline by Deputy CM Ajit Pawar)
पावसासाठी अजितदादांचं पांडुरंगाला साकडं
कारखान्यांच्या गळीत हंगामाबाबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. गेल्या काही दिवसात पावसाने ओढ दिली आहे. पांडुरंगा चांगला पाऊस पडू दे, सगळी धरणं भरु दे, साकडंही अजित पवार यांनी पांडुरंगाला घातलं. दरम्यान, पाणी देत असताना वीजबिलही द्यायला हवं. आर्थिक शिस्त लावणं गरजेचं असल्याचंही अजितदादा म्हणाले.
‘कोण मायचा लाल सकाळी 6 ला काम सुरु करतो’
वेळद्या अशी कार्यकर्ते मागणी करतात. कोण मायचा लाल सकाळी 6 वाजेपासून काम करतो. आजही सकाळी पावणे सहालाच दौरा सुरु केलाय. पवार साहेबांनी आम्हाला कामाची सवय लावली आहे. आता कामाचा व्याप वाढला आहे. मुंबईत, पुण्यात वेळ द्यावा लागतो. मात्र, असं असताना नवी पिढीही तयार केली पाहिजे असंही अजितदादा म्हणाले.
अष्टविनायकांसाठी विकास आराखडा
अष्टविनायक देवस्थांनांबाबत बैठक घेणार असल्याचं सांगत एक विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. आता प्रत्येक ठिकाणी मास्टर प्लॅन करणार. अष्टविनायकाच्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा असाव्यात, रस्ते असावेत असा आराखडा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
तिजोरीच्या चाव्या हातात असल्यामुळे वाढप्या जास्त वाढतोय
सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा. घोंगडी बैठकांमध्ये कामं लिहून घ्यायचे, विरोधक त्यावर टीका करायचे. पण पहिल्या दीड वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कामं मार्ग लागली आहेत. तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात असल्यामुळे वाढप्या जास्त वाढतोय. मात्र, इतरांचांही त्यावर हक्क आहे याचं भान राखणं आवश्यक असल्याची कोटीही अजितदादांनी यावेळी केली.
इतर बातम्या :
Video : जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जोरदार शॉक!
ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, शिवसेनेचा बडा मंत्री म्हणतो, महाराष्ट्राला हेच अपेक्षित!
BhumiPujan of Janai Right Canal Pipeline by Deputy CM Ajit Pawar