अजितदादा लयभारी, अर्थ खातं चालवण्यास…. शिंदे गटाच्या आमदाराकडून पहिल्यांदाच अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक
बुलढाण्यात शिवसेनेचे दोन आमदार, एक खासदार आणि भाजपाचे तीन आमदार असल्याने बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही. सरकार आमदारांच्या भरवशावर चालतं. त्यामुळे त्यांना डावलून वरिष्ठ निर्णय घेत नसतात.
बुलढाणा : शिंदे सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. ज्या अजित पवारांचे कारण सांगून, ते निधी देत नसल्याचा आरोप करून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले, तेच अजित पवार आता सत्तेत परतले आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या आमदारांचा विरोध असताना सुद्धा अजित पवारांकडे अर्थखाते देण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार अस्वस्थ आहेत. दरम्यान विविध वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केले आहे, त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अजितदादा अर्थखातं चालवण्यास सक्षम असल्याचं सांगत गायकवाड यांनी अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं.
आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावरही आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यावेळी आमदार गायकवाडांनी केला होता. दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आता जवळपास अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आता मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?, असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांना काल पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.
यावेळी काही झाले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही, अशी कडक भूमिका आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार आहेत. त्यामुळे एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू देणार नसल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. त्यामुळे बुलढाण्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे.
विषय पांचट झालाय
गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवरून आपल्याच सरकारवर टीकाही केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होऊन तो संपला पाहिजे. हा विषय आता पांचट झाला आहे, असं गायकवाड म्हणाले. तर अजित पवारांसोबत काय झालं हे सर्वांनीच पाहिलं. 2004 साली ते मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना होऊ दिल नाही, त्यानंतर त्यांना राज्यात न ठेवता लोकसभेत पाठवण्यात आल, अजित पवारांच प्रस्थ वाढत असल्याची कुणकुण लागताच शरद पवारांनी राजीनाम्याचा फंडा फेकला आणि कार्यकर्त्यांना भावनिक केलं. नंतर पक्षाच्या नियुक्ती केल्या. मात्र अजित पवार यांना काहीच दिलं नाही. त्यामुळे त्यांनी असं पाऊल उचललं, असंही त्यांनी सांगितलं.
अजितदादा भारी
अर्थखाते अजित पवारांकडे जायचं नसल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं दिल्ली हायकमांडने सांगितल्यानंतर शिंदे गटाने त्यामध्ये माघार घेतली, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. मात्र संजय राऊत यांची मनघडंत कहानी असते. राज्यामध्ये अजित पवार, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेच अर्थ खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, हे तिघेही भारी आहेत आणि सरकारही भारी चालवणार आहेत, असा दावा त्यांनी केला.