Ajit Pawar : दिल्ली दौरे करा, पण आधी महाराष्ट्राच्या जनतेकडंही पाहा, अजित पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टोला
राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि जनतेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार टोला हाणलाय. दिल्ली दौरे करा, पण आधी महाराष्ट्राच्या जनतेकडं पाहा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
मुंबई : राज्यात शिंदे आणि फडणवीसांचं सरकार येऊन जवळपास 25 दिवस लोटले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने दिल्ली दौरे करत आहेत. मात्र, अजूनही खातेवाटपाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. दुसरीकडे राज्यातील काही भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि जनतेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार टोला हाणलाय. दिल्ली दौरे करा, पण आधी महाराष्ट्राच्या जनतेकडं पाहा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अशावेळी तातडीनं पावसाळी अधिवेशन घ्या. आम्ही 18 जुलैला अधिवेशनाची तारीख नक्की केली होती. पण राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर 25 जुलैला अधिवेशन घेऊ असं सांगितलं. पण अजूनही हे सरकार अधिवेशन घेत नाही. तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करण्यापासून कुणी अडवलंय?
‘अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा’
आज मी विरोधी पक्ष या नात्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा. आज सगळी धरणं भरली आहे. अनेक धरणं ओव्हर फ्लो होतील अशी भीती आहे. काही ओव्हर फ्लो झाली आहेत. एक गोष्ट चांगली झाली चिपळून, महाड भागात यंदा पुराचं संकट आलं नाही. आम्ही आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधीमार्फत नदीतील गाळ काढला होता. राहिलेला गाळ पावसाळ्यानंतर काढण्याची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. मी काही भागात पाहणी केली आहे. अजून काही भागात मी आणि आमचे नेते पाहणी करतील, अशी माहितीही अजितदादांनी दिलीय.
‘तातडीनं अधिवेशन बोलावा’
नेहमीच्या एनडीआरएफच्या नियमांनुसार मदत देऊन चालणार नाही. मागे अनेकदा आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळे नियम बाजूला ठेवून दुप्पट, तिप्पट मदत केली पाहिजे. आपल्या भागातील जनता मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना त्यांना मदत करायची नाही का? नेहमी हे दोघं सांगत आहेत आम्ही असं करु तसं करु. पण तातडीनं अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांकडे केलीय.