मुंबई | 27 डिसेंबर 2023 : देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे. तसेच त्यापाठोपाठ प्रलंबित असणाऱ्या महापालिका निवडणुकांचं देखील बिगूल वाजण्याची भविष्यात शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूश असायला हवेत. त्यांच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा असणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी मिळणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहनं देण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. तब्बल 40 हून अधिक गाड्या अजित पवार गटाकडून विकत घेण्यात येत आहेत. या गाड्या आज स्टेट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. या गाड्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
“प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही. पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना, कधी काय होईल सांगता येत नाही. निवडणुका जाहीर होऊ द्या. मग बघा पळापळ. ते 40 गाड्या काय 400 गाड्या घेतील. ते कालांतराने प्रत्येक आमदारालाही गाडी देणार आहेत. गाडीबरोबर दोन माणसंही देणार आहेत. ड्रायव्हरही देणार आहेत. कारण नजर ठेवायला लागेल ना, निवडणूक जाहीर झाल्यावर कुणी पळून जायला नको”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. सुनील तटकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आव्हाडांवर टीका केली. “आम्ही एकत्र असतानाही वाहने दिली होती. केवळ बोलघेवडे आणि प्रसिद्धीसाठी हापापलेला कुणाही व्यक्तीच्या वक्तव्यावर मी बोलू इच्छित नाही”, असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं.