स्पेशल रिपोर्ट : शरद पवारांच्या कार्यकर्त्याला अजित पवारांच्या आमदारांची शिवीगाळ!
अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणेंचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ आजचाच असून इंदापूर तालुक्यातला आहे. या व्हिडीओत भरणे, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवागाळ करतायत. तर भरणेंनी, हा कार्यकर्ता नसून रोहित पवारांच्या कंपनीचा कर्मचारी असल्याचं म्हटलंय आणि भरणेंनी पैसे वाटपाचा आरोप केलाय.
बारामतीत मतदान पार पडलं. पण त्याआधी अंथुर्णे इथं उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. दत्ता भरणेंचं म्हणणं आहे, की हा कार्यकर्ताच नव्हता. तर आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचा कर्मचारी आहे आणि तो पैसे वाटत होता त्यामुळं आपल्याला दिसताच तिथं त्याला रोखलं आणि त्याला चोप बसवण्यापासून वाचवलं. तर अजित पवार गटाकडून मनी आणि मसल पॉवरचा वापर होत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केलीय.
दत्ता मामा भरणेंच्या व्हिडीओसह रोहित पवारांनी, पैसे वाटपाचे काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप, रोहित पवारांनी केलाय. मतदानाच्या आदल्या रात्री भोर तालुक्यात एक गाडीच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ज्यात 500 च्या नोटा गाडीत पडलेल्या दिसतायत आणि पैशांच्या बॅगाही कार्यकर्त्यांनी पोलिसांना पकडून दिल्या आहेत.
रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय?
रोहित पवारांनी ट्विट केलेल्या दुसरा व्हिडीओ बारामतीच्या काटेवाडीतला आहे. माजी सरपंच विद्यमान संरपंचाच्या मुलाला पैसे देत असल्याचा आरोप, रोहित पवारांनी केलाय. “अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून 2500 ते 5 हजार मताप्रमाणं पैसे वाटले”, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बगलबच्च्यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही, असे प्रकार केलेले नाही”, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय.
तिसऱ्या व्हिडीओत काय?
तिसरा व्हिडीओ, हा पुणे जिल्हा बँकेचा आहे. रात्री 2 वाजेपर्यंतही जिल्हा बँक कशा सुरु आहेत? हे सांगताना पैसे वाटण्यासाठीच बँक उघडी ठेवण्यात आली का ? असा सवाल रोहित पवारांनी केला. तर रोहित पवारांवर परिणाम झाल्याची टीका अजित पवारांनी केला. “रोहित पवारांवर परिणाम झाला, उत्तर देण्याचीही गरज वाटत नाही”, असं अजित पवार म्हणाले. शरद पवार गटानं हे व्हिडीओ निवडणूक आयोगाकडे दिले असून तक्रारीचं पत्र दिलंय. त्यामुळं आयोग नेमकं काय भूमिका घेतं? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.