Ajit Pawar : शरद पवार काल म्हणाले, अजितला बाहेरच्या राज्यातील माहिती नाही; अजितदादा म्हणतात, माझी लायकी नाही!
अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे, असं पवार म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांना विचारलं असता, पवारसाहेब बोलले ते योग्यच आहे. मला फक्त महाराष्ट्रातील राजकारणाबाबत जाण आहे. साहेबांनी एकदा स्टेटमेंट केल्यानंतर त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या तरी शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारलं असता, अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून हे पाहून विधान केलं आहे. इथं प्रत्यक्ष लोक हलवणं आणि हे ऑपरेशन करणं यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे सहकारी दिसते. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे, असं पवार म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांना विचारलं असता, पवारसाहेब बोलले ते योग्यच आहे. मला फक्त महाराष्ट्रातील राजकारणाबाबत जाण आहे. साहेबांनी एकदा स्टेटमेंट केल्यानंतर त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
अजित पवार म्हणाले की, शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? याबाबत मी काल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पवारसाहेबांनीही वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रापुरती मला जेवढी माहिती आहे. कालपर्यंत मला जे पाहायला मिळालं, त्याबाबत मी बोललो. पवारसाहेब आमचं दैवत आहे, आमचे सर्वोच्च नेते आहेत. साहेबांनी एकदा स्टेटमेंट केलं की त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही.
अजित पवार भाजपबाबत काय म्हणाले होते?
भाजप ईडी आणि सीबीआयचा दबाव टाकून आमदारांवर दहशत माजवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जातोय. खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पत्रकारांनी शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा सवाल विचारला. त्यावेळी अजित पवार यांनी अजून तरी तसं वाटत नाही. आताच्या घडीला कोणत्याही भाजपचा नेता तिथं येऊन काही करतो हे दिसत नाही.. मोठा नेता, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं होतं.
शरद पवार अजितदादांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून हे पाहून विधान केलं आहे. इथं प्रत्यक्ष लोक हलवणं आणि हे ऑपरेशन करणं यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसते. अजित पवारांना स्थानिक माहिती जरूर आहे. परंतु गुजरात आणि आसामची स्थिती आम्हाला अधिक माहीत आहे. राज्याच्या बाहेर आहे. मी एक उदाहरण सांगतो. शिंदेंचं एका मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हटलंय. माझ्याकडे देशातील सर्व पक्षाची यादी आहे. त्यात देशात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, मायावती, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही अधिकृत यादी आहे. आता तुम्हीच सांगा सीपीआय सीपीएम काँग्रेस राष्ट्रवादीचा यात हात आहे का? मग जे नाहीत त्याचा तुम्ही विचार केला तर आहेत कोण हे सांगावं लागत नाही, असे म्हणत त्यांनी थेट भाजपकडे बोट दाखवलं.