मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपली कार्यपद्धती, निर्यणक्षमता, बिनधास्तपणा आणि सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात. त्यातच अजित पवारांनी सध्या अधिकाऱ्यांच्या (Officers) कानउघाडणीचा सपाटा सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार कोयना धरण शेजारच्या विश्रामगृहात (Rest house) गेले होते. या विश्रामगृहाचं नुतनीकरण करण्यात आलं होतं. अजित पवार आत शिरताच सर्वात आधी सरसकट डबल बेड का, म्हणून त्यांनी अधिकाऱ्याला पहिला प्रश्न केला. नंतर अजित पवारांचं लाईटसाठी काढलेल्या पॉईंटकडे लक्ष गेलं. एकाच खोलीत गरज नसतानाही असंख्य पॉईंट्स काढलेले होते. कारण, इलेक्ट्रिशयनला पॉईंट्प्रमाणे पैसे मिळतात, अजित पवारांनी त्या पॉईंट्सवरुनही चांगलीच खरडपट्टी काढली.
नुतनीकरणानंतर बाथरुम, टॉयलेटमधले फ्लश व्यवस्थित चालतायत की नाही, याचीही पाहणी खुद्द अजित पवारांनी केली आणि पाहणीनंतरच्या कार्यक्रमात मात्र त्या अधिकाऱ्याला चांगलंच सुनावलं. तिकडे बुलडाणा दौऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तूंची अजित पवारांनी पाहणी केली. नव्या बांधकामाच्या हट्टामुळे पुरातन वास्तूंना धक्का तर लागला नाही ना, हे पाहण्यासाठी अजित पवारांनी चक्क टॉर्च घेऊन पाहणी केली.
बाहेरच्या आवारात जुन्या बांधकामावरुन तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. त्यावरुनही शिवनेरीवर कसं बांधकाम झालंय, ते आधी बघून या, असा सल्ला अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. आजूबाजूला जुनं बांधकाम आणि मध्येच पेवर ब्लॉक टाकल्यामुळेही अजित पवारांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचं पाहायला मिळालं.
बांधकाम, झाडं, नुतनीकरण केलेल्या इमारती आणि स्वच्छता यावर अजित पवारांचं बारीक लक्ष असतं. बारामतीत फोटो काढण्याच्या नादात काहींनी झाडांवर पाय दिला होता. त्यावरुनही अजित पवार भडकले. शिवाय एका वास्तूबाहेरची झाडं काही लोक वारंवार तोडून नेत असल्याचं लक्षात आल्यानंतर जाहीर सभेतच अजित पवारांनी त्यावरुन भाष्यही केलं. त्यामुळे अजित पवार भले उपमुख्यमंत्रीपदावर असले, त्यांच्या हातात राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी असली, तरी त्यांचं लक्ष हे अगदी बारिकसारिक गोष्टींकडेही असतं, हे लक्षात घ्यायला हवं.