Ajit Pawar IT Raids : अजित पवार, पाहुणे, बहिणी आणि साखर कारखान्यांच्या व्यवहाराचं गौडबंगाल, नेमकं काय आहे? वाचा सविस्तर
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील बहिणींवरही आयकर विभागानं छापा टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. गुरुवारपासून सुरु झालेलं हे धाडसत्र आजही सुरुच आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील बहिणींवरही आयकर विभागानं छापा टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Income tax department raids Sugar factories related to Ajit Pawar and three sisters House)
अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारी
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे. अजितदादांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे.
विजया पाटील
विजया पाटील यांच्या घरी आज पुन्हा एकदा आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. विजय पाटील यांचा प्रकाशनाचा व्यवसाय आहे. त्यांचे पती डॉ. मोहन पाटील हे प्रख्यात भूलतज्ज्ञ आहेत. मुक्ता पब्लिकेशनच्या माध्यमातून शैक्षणिक पुस्तकं, पोस्टकार्ड ग्रीटिंग कार्डचं प्रकाशन केलं जातं. 2005 मध्ये स्थापन केलेली मुक्ता पब्लिकेशन महाराष्ट्रातली 5 व्या क्रमांकाची प्रकाशन संस्था आहे.
नीता पाटील
अजितदादांची दुसरी बहीण नीता पाटील यांच्या पुण्याच्या मोदी बागेतील घरीही आयकर विभागाची धाड पडली आहे. याच मोदीबागेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचंही निवासस्थान आहे. नीता पाटील यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती मिळतेय.
रजनी इंदुलकर
पुण्यातली उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या पंचवटी भागातही आयकरचे अधिकारी धडकले. अजित पवारांची तिसरी बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांच्या घरी छापा टाकण्यात आला. डॉ. रजनी इंदुलकर, या अजित पवारांच्या चुलत बहीण आहेत. तर कर्जतचे आमदार रोहित पवारांच्या त्या सख्या आत्या आहेत. रजनी इंदुलकर यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशी कागदपत्रांची तपासणी करण्यात आलीय. पण कोणत्या संस्थेशी, कुठले व्यवहार आयकरच्या रडारवर आहेत, हे अजून समोर आलेलं नाही. (Income tax department raids Sugar factories related to Ajit Pawar and three sisters House)
अजितदादांशी संबंधित कारखान्यांवरही धाडसत्र
अजित पवारांच्या 3 बहिणींबरोबरच, 4 साखर कारखान्यांतील कागदपत्रांची छाननी आयकर विभागाकडून केली जातेय. यात साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखाना, नंदुरबारमधला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना, अहमदनगरमधला अंबालिका, तर पुण्यातील दौंड शुगर साखर कारखान्याचा समावेश आहे. आयकर विभागाची पहिली नजर अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावरच पडली. सलग दुसऱ्या दिवशी आयकरच्या अधिकाऱ्यांकडून जरंडेश्वर कारखान्यात कारवाई सुरु आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना
79 कोटीच्या कर्ज थकल्यानंतर जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव झाला. गुरु कमोडिटीनं हा कारखाना 65 कोटीत विकत घेतला. आता हा कारखाना ईडीनं जप्त केलाय. जरंडेश्वर कारखाना राजेंद्र घाडगे चालवत होते. घाडगे हे अजित पवारांचे मामा आहेत. अजित पवारांनी गैरव्यवहार केला असून, आत्ताचे छापे जरंडेश्वरच्या संदर्भातच पडलेत, असा आरोप माजी मंत्री शालिनी पाटील यांनी केलाय.
पुष्पदंतेश्वर साखर कारखाना
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, यांचेही निकटवर्तीय आयकर विभागाच्या रडारवर आलेत. नंदुरबारमधील पुष्पदंतेश्वर साखर कारखान्यावरही झाडाझडती झालीय. पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन शिंगारे पार्थ पवारांचे निकटवर्तीय आहेत. या कारखान्यावर 48 कोटींचं कर्ज थकीत असल्यानं हा कारखाना लिलावात काढला. आधी हा कारखाना पार्थ ऑट्रेलिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं खरेदी केली. नंतर हा कारखाना आयन मल्टिट्रेट कंपनीला विकला.
अंबालिका साखर कारखाना
आयकरचे अधिकाऱ्यांच्या टार्गेटवर अहमदनगरचा अंबालिका साखर कारखानाही आला आहे. अंबालिका कारखान्यावर जिल्हा बँकेचं 20 कोटींचं कर्ज थकलं होतं. 2005 मध्ये दिवाळखोरीनंतर कारखाना लिलिवात निघाला. पुढे अजित पवारांचे निकटवर्तीय विनोद गोयंका आणि प्रमोद गोयंका यांच्या कंपनीनं कारखाना 28 कोटीत खरेदी केला.
दौंड शुगर कारखाना
पुणे जिल्ह्यातल्या दौंड शुगर कारखान्यावरही आयकर विभागाचे 7 ते 8 अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. दौंड शुगर कारखाना हा 13 वर्षांपूर्वी आलेगावात खासगी तत्वावर सुरु झाला. अजित पवारांचे नातेवाईक जगदिश कदम हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. तर अजित पवारांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे या कारखान्याचे संचालक आहेत. अजित पवारांचा या कारखान्याशी थेट संबंध नसला तरी अजितदादांचा प्रभाव असल्याची चर्चा मात्र आहे.
इतर बातम्या :
चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राजकारण पेटणार? राणेंच्या टीकेला अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर
आयकर विभागाच्या छाप्यांबाबत खुलासा करा, भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान
Income tax department raids Sugar factories related to Ajit Pawar and three sisters House