Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ कोणासोबत? मविआ उमेदवारासोबतच्या त्या व्हायरल फोटोवर अखेर दिलं स्पष्टीकरण
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नरहरी झिरवाळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मविआ उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेत्यांच्या शेजारी नरहरी झिरवाळ बसले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत व्यासपीठावर दिसले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मविआ उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेत्यांसोबत नरहरी झिरवाळ यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नरहरी झिरवाळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून भारती पवार तर मविआकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच दिंडोरीमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ आमदार आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजा करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रह खातर मी खुर्चीवर बसलो. त्यावेळी शेजारी दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेते येऊन बसले. काही मिनिटातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी तिथून निघून गेले. मी अजित पवारांसोबतच आहे” असं नरहरी झिरवळ म्हणाले.
नरहरी झिरवाळ यांची काय खेळी?
नरहरी झिरवाळ हे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. झिरवाळ यांच्या निवडणुकीत श्रीराम शेटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीराम शेटे यांची ओळख आहे. भास्कर भगरे यांना मविआकडून उमेदवारी देण्यात श्रीराम शेटे यांची सुद्धा भूमिका होती, असं बोललं जातं. नरहरी झिरवाळ यांचे श्रीराम शेटे यांच्याशी चांगले संबंध आहेत. महायुतीमध्ये असल्याने झिरवाळ उघडपणे भगरे यांच्या समर्थनाथ बोलू शकत नाहीत. त्यामुळे या फोटोच्या माध्यमातून कार्यकर्ते, मतदार यांना मेसेज देण्याची देखील खेळी असू शकते अशी चर्चा आहे.