Rupali Patil : ‘एकाच महिलेला किती पदं?’, रुपाली चाकणकरांवरुन अजित पवार गटातील मतभेद उघड
Rupali Patil : "रुपाची चाकणकरांनी संधी ही बातमी आल्यावर माझ्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला सांगितलं ही बातमी पक्षाने दिलेली नाही" असं रुपाली पाटील म्हणाल्या.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुपाची चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. रुपाली पाटील यांनी या विषयावर रोखठोक मत मांडलं आहे. त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. “हा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराचे काही नियम आहेत. यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सोशल वर्कर म्हणजे तज्ज्ञ लोकांनी निवड हे आमदार निवडण्याचे नियम आहेत” असं रुपाली पाटील म्हणाल्या.
“काल जी बातमी लागली, तो आमच्यासाठी धक्का होता. लोकशाही पद्धतीने कोणाच नाव घेतलं नाही. रुपाची चाकणकरांनी संधी ही बातमी आल्यावर माझ्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला सांगितलं ही बातमी पक्षाने दिलेली नाही” असं रुपाली पाटील म्हणाल्या.
‘मग या बातम्या येतात कुठून?’
“मग अशा बातम्या येतात कुठून? कोणीही आमदारकीसाठी इच्छूक असू शकतं. मी, वैशालीताई, सुरेखाताई ठाकूर, दीपकभाऊ मानकर, बाबा पाटील इच्छुक आहोत. रुपाली चाकणकर माझ्या दुश्मन नाहीत. त्यांच्याकडे ऑलरेडी महिला आयोगाच अध्यक्षपद आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. मग या बातम्या येतात कुठून?” असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला.
‘मी पण अजितदादाची लाडकी बहीण’
“अजितदादांनी लाडकी बहिण योजना आणली. मी पण अजितदादाची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार. याबाबत मी अजितदादाशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे” असं रुपाली पाटील म्हणाल्या. एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.