Ajit Pawar : ‘मातोश्री’बाहेरच हनुमान चालिसा म्हणण्याचा अट्टाहास का? अजित पवारांचा सवाल; भाजपवर घणाघात
हनुमान चालिसा पठणासाठी तुमचं घर नाही का? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था का बिघडवता? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारलाय. मुंबईत बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्मया उपस्थितीत पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
मुंबई : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन राज्यात सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार नवनित राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा आणि भाजप नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत आहेत. राणा दाम्पत्याने तर दोन दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची चांगलीच कोंडी केलीय. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. ‘मातोश्री बाहेरच हनुमान चालिसा म्हणायचा अट्टाहास का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. हनुमान चालिसा पठणासाठी तुमचं घर नाही का? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था का बिघडवता? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारलाय. मुंबईत बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्मया उपस्थितीत पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
‘कुणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नये’
अजित पवार म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे मराठीपण टिकलं पाहिजे. बाहेरच्यांनी यावे, राहावे, खावे पण वातावरण बिघडवू नये. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नये. आपण लोकप्रतिनिधी आहोत, इतक्या लोकांचं प्रतिनिधीत्व करतो. राजकारणाची पोळी कुणी भाजण्याचा प्रयत्न करु नये. महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान जोडला गेलाय. विकास करताना कुणी अडचणीत येवू नये असा प्रयत्न करायला हवा, असंही अजितदादा यांनी म्हटलंय.
मुंबईकरांना ही सेवा देण्यासाठी धन्यवाद – अजित पवार
विकास आम्ही करतोय आणि काही लोकांना काय आठवतं. रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. सण, उत्सव सुरु आहेत. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाची गरज काय? असा सवालही त्यांनी केलाय. मुंबई महानगरपालिका खूप आधीपासून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहे. बेस्ट उपक्रमाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सर्व सेवेसाठी कार्ड चालणार आहे. देशभरात इतर मेट्रो आणि इतर बसमधून फिरू शकता. गॅस आणि लाईट बिलाचं पेमेंट या कार्डमधून करु शकता. मुंबईकरांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईत ही अशी सेवा सुरु होत आहे. मुंबईकरांना ही सेवा देण्यासाठी मी धन्यवाद देतो, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
दादागिरी करुन याल तर.. मुख्यमंत्र्यांचा इशारा
घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. इकडे हनुमान चालिसा असेल करा पठण. रामदास स्वामींनीही भीमरुपी महारुद्रा लिहून ठेवलं आहे. ते भीम रुप आणि महारुद्र शिवसेना दाखवून देईल. कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. हनुमान चालिसा बोलायची आहे तर या. तुमच्या घरात ती संस्कृती नसेल तर आमच्या घरात या. पण त्याला एक पद्धत असते. साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा… आमच्या घरी साधू संत येत असतात. पण ते सांगून येतात. आलात तर स्वागत करु. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची ते आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत सांगितलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
इतर बातम्या :