इंदापूरची जागा कुणाला? अजित पवार म्हणतात…
इंदापूर : इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे होत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेची जागा काँग्रेसलाच द्यावी, यासाठी आग्रह धरला आहे. इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका घेतली आहे. असे असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “इंदापूर […]
इंदापूर : इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे होत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेची जागा काँग्रेसलाच द्यावी, यासाठी आग्रह धरला आहे. इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका घेतली आहे. असे असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “इंदापूर विधानसभेचा प्रश्न आला कुठे?” असा सवाल करत, “आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु”, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे इंदापूरबाबतचा तेढ आणखीच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंदापूर तालुक्यातल्या पोंधवडी येथील विविध विकासकामांचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर इंदापूर विधानसभेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल अजित पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी आम्ही सध्या लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय, त्यामुळे आधी लोकसभा जिंकायचीय आणि मग विधानसभेबाबत चर्चा करु, असं सांगत इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
इंदापूरची जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसकडेच राहील : विश्वजित कदम
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी घेतला आहे. मात्र मागील 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपविरोधात निर्माण झालेली नाराजी लक्षात घेत सर्व विरोधी पक्षांची मोट बांधत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आघाडी झाली असली तरी इंदापूरमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांनी एकवेळ आघाडी झाली नाही तरी चालेल, पण इंदापूरची आगा काँग्रेसला देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.
विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, संग्राम थोपटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम करुनही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुरघोडीचे राजकारण होत असल्याबाबत खंत मांडली होती. तसेच विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहीर केल्याशिवाय लोकसभेला आघाडीच्या उमेदवारांचं काम करणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्याच अनुषंगाने काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून इंदापूरची जागा काँग्रेसला देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी आधी लोकसभा जिंकायची मग विधानसभेची चर्चा करण्याची भूमिका घेतल्यामुळे इंदापूरच्या जागेबाबत तेढ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.