एका जिल्ह्यामुळे मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीस सहा जिल्ह्यात कसं काय काम करणार?; अजितदादांचा सवाल
मलाही संताप येतो. मीही बोलायला कडक आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो. पण कुणाला कसं बोलायचं हे समजतं. सकाळी सहापासून कामे करतो.
नाविद पठाण, टीव्ही9 प्रतिनिधी, बारामती: शिंदे सरकार… (shinde government) तुम्हाला संधी मिळालीय. कशी मिळालीय…गद्दारी केली की नाही मला माहीत नाही. पण तुम्ही जनतेची कामे करा ना आता. पालकमंत्री नेमलेत. कुणाला एक जिल्हा, कुणाला दोन जिल्हे दिले. पण फडणवीसांना (devendra fadnavis) 6 जिल्हे दिलेत. एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं. आता सहा जिल्हे म्हटल्यावर काय होणार काय माहीत. आता त्यांनी जनतेची कामे करावीत. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी लगावला.
बारामतीत तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला. खरेदी विक्री संघात काजीजण गैरव्यवहार करतात. काहींना संचालकांचा हात आहे म्हणून क्लिन चिट दिली जाते. वेगवेगळ्या तक्रारी आहेत. असं चालत असेल तर मला कारवाई करावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी पारदर्शक माहिती दिलीच पाहिजे. आपली मुलंही ऐकत नाहीत. कामगारांनाही बोलून चालत नाही. पण काही संस्थांचे संचालक बैठकीला आल्यानतर कामगारांशी चुकीचं वागतात. चांगली व्यक्ती कशी ओळखावी. एखादा ड्रायव्हर 25/30 वर्षे टिकला असेल तर तो माणूस चांगला आहे. त्या व्यक्तीची वागणूक चांगली आहे म्हणून तो ड्रायव्हर टिकला, असं ते म्हणाले.
काहींच्या बाबतीत तक्रारी येतात. अधिकारी नीट बोलत नाहीत. अधिकारी, खातेप्रमुख ही महत्वाची लोकं आहेत. मलाही संताप येतो. मीही बोलायला कडक आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो. पण कुणाला कसं बोलायचं हे समजतं. सकाळी सहापासून कामे करतो. अधिकारीही येतात. जिव्हाळा आहे म्हणून अधिकारी येतात. सारखंच आपण चुकीच वागलो तर अधिकारी कसे टिकतील? अधिकारी, खातेप्रमुख यांच्याशी नीट वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.
काहीजण संस्थांच्या जीवावर राजकारण करतात.. आर्थिक भार त्या संस्थांवर टाकतात. मीही कधी कोणत्या संस्थेची गाडी वापरली नाही. महाराष्ट्रात कोणत्या खरेदी विक्री संघाने चांगले काम केले असेल तर त्यांचे अनुकरण करा, असं आवाहन त्यांनी केलं.