गोपीकिशन बाजोरियांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे : नाना पटोले
विधान परिषदेसाठी अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा विजय निश्चित आहे. आघाडीचा घटक या नात्याने काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे नाना पटोले म्हणाले.
मुंबई : अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
काँग्रेस पक्ष बाजोरिया यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
“विधानपरिषदेसाठी अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा विजय निश्चित आहे. आघाडीचा घटक या नात्याने काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 55 वर्षांचा भाजपाचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करून दणदणीत विजय मिळवला होता. अकोला-वाशिम-बुलडाणामधूनही बाजोरियांच्या विजयासाठी महाविकास आघाडी कार्यरत आहे. येथे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता गोपीकिशन बाजोरिया यांच्या विजयासाठी काम करावे,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो म्हणाले.
एकूण 821 मतदार मतदान करणार
भाजप-शिवसेना युती दुभंगल्यामुळे हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. विजयाचा आकडा जुळविण्यात कोण यशस्वी होतो हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. या निवडणुकीसाठी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील मनपा, न.प., जि.प. व नगर पंचायत सदस्य मतदान करतील. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली असून एकूण 821 मतदार आहेत यात 389 पुरुष आणि 432 महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक 368 मतदार हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. अकोल्यात 285 तर वाशिम जिल्ह्यात एकूण 168 मतदार आहेत.
महाविकास आघाडीकडून एकत्रितरित्या उमेदवाराची घोषणा
दरम्यान, ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितरित्या उमेदवाराची घोषणा केली असून शिवसेनेकडून बाजोरिया यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. गेल्या चार टर्मचा विचार करता या मतदारसंघात अकोल्यातून आव्हान दिले गेले नाही. गेल्या तीन्ही निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला अनुक्रमे लता इंगोले, राधेश्याम चांडक व रवींद्र सपकाळ यांनी आव्हान दिले होते. हे तिन्ही उमेदवार अकोल्याच्या बाहेरील होते. पण यावेळी पाहिल्यांदाच अकोल्यातील प्रतिस्पर्धी मिळणार आहे. भाजपने अकोल्यातील सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे.
इतर बातम्या :