‘त्या’ 16 आमदारांची आमदारकी रद्द होणार? सुप्रीम कोर्टाच्या महानिकालाकडे देशाचं लक्ष; बंडाळीचा घटनाक्रम काय होता?
राज्याच्या सत्ताकारणावर आज सर्वोच्च न्यायालयात मोठा निर्णय होणार आहे. शिवसेनेत बंड करणारे 16 आमदारांची आमदारकी राहणार की जाणार? हे आजच स्पष्ट होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल देणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असाच असणार आहे. या निकालामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार राहणार की नाही? याचा फैसला होणार आहे. या शिवाय त्या 16 आमदारांची आमदारकी राहणार की जाणार? याचाही फैसला आजच होणार आहे. त्यामुळे या आमदारांची धाकधूक वाढली आहे.
राज्याच्या सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांचे घटनापीठ निर्णय देणार आहे. हा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाचा राहणार आहे. याच निकालाच्या अनुषंगाने भविष्यातील राजकीय पेचावर निकाल दिले जाणार असल्याने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. आजच्या निकालातून राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव असताना त्यांचे अधिकार आदी गोष्टींवर फैसला होणार आहे. या शिवाय पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भानंही आजच्या निकालात भाष्य होणार आहे.
काय होतं प्रकरण?
जून 2022मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार गायब झाले. विधिमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीलाही हे आमदार उपस्थित राहिले नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार्टीचा मुख्य प्रतोद नियुक्त केला. त्याने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांद्वारा बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली. तसेच त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केली.
त्याचवेळी बंडखोर आमदारांनी उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस बजावली. मात्र, योग्य कार्यवाहीनुसार ही नोटीस आली नसल्याचं सांगून ती फेटाळून लावण्यात आली.
उपाध्यक्षांनी अपात्रतेची कार्यवाई सुरू केल्याने बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या आमदारांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी अधिक वेळ दिला.
त्या दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनी महाराष्ट्र सोडलं. आपल्या जीवाला आणि संपत्तीला धोका असल्याचं सांगत राज्यपालांशी संपर्क साधला
त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचं सांगून बहुमत चाचणी घेण्याची विनंती राज्यपालांना केली.
राज्यपालांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र उद्धव ठाकरे यांनी बहुमत सादर करण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित करून कोर्टात धाव घेतली
‘ते’ 16 आमदार
1) एकनाथ शिंदे 2) अब्दुल सत्तार 3) संदीपान भुमरे 4) संजय शिरसाट 5) तानाजी सावंत 6) यामिनी जाधव 7) चिमणराव पाटील 8) भरत गोगावले 9) लता सोनावणे 10) प्रकाश सुर्वे 11) बालाजी किणीकर 12) अनिल बाबर 13) महेश शिंदे 14) संजय रायमुलकर 15) रमेश बोरणारे 16) बालाजी कल्याणकर