‘गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्र उत्सवही जोरात होणार’, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, राज्यात सर्व उत्सव आता निर्बंधमुक्त
'आपलं सरकार आलं की सगळं कसं खुलं खुलं होतं. गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्रोत्सवही जोरात होणार. खेळांच्या सुविधा आमच्या गोविंदांना मिळणार आहेत. आपण विकासाची हंडी फोडलीय. त्याची फुले सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत'.
मुंबई : कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षात राज्यात एकही सण, उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडूनही सर्व सण, वार, उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. यंदा राज्यातील सरकारही (Maharashtra Government) बदललं आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवावरील (Dahi Handi Festival) सर्व निर्बंध हटवले. त्यानंतर यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडतोय. भाजप आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी गणपती उत्सव आणि नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा केलीय.
‘आपण विकासाची हंडी फोडली, त्याची फुले सगळ्यांपर्यंत पोहोचणार’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपलं सरकार आलं की सगळं कसं खुलं खुलं होतं. गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्रोत्सवही जोरात होणार. खेळांच्या सुविधा आमच्या गोविंदांना मिळणार आहेत. आपण विकासाची हंडी फोडलीय. त्याची फुले सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे. यावेळी फडणवीस यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा सगळे सण, उत्सव निर्बंधमुक्त होणार
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 जुलैरोजी यावर्षीचे सर्व सण निर्बंधमुक्त असतील अशी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव आणि मोहरम मोठ्या उत्साहात साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही गणेश विसर्जन आणि दहीहंडीबाबत बैठकीत घेतलेले निर्णय सांगितले.
गणेशोत्सवासाठी घालण्यात येणाऱ्या मंडपवाल्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मंडवाल्यांना परवानगीसाठी सतत खेटे घालावे लागू नयेत त्यासाठी एक खिडकी योजना चालू करण्याची सुचनाही देण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, क्लिष्ट अटी व शर्ती असू नयेत यासाठी एक खिडकी योजनेचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीत मंडळाना नोंदणी शुल्क भरावे लागू नये यासाठी सवलत आणि सूट देण्यात आली आहे. उत्सावासाठी हमी पत्र घेण्याचीही गरज नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.