औरंगाबादः राष्ट्रीय पातळीवरील नेते भाजपविरोधात लढत असताना स्थानिक पातळीवर काँग्रेस नेतृत्व मात्र भाजपसोबत घरोबा करत असल्याचा आरोप औरंगाबादमधील काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केला आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजप नेते हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे (Kalyan Kale) स्वतः मदत करत असल्याचा आरोप विलास औताडे यांनी केलाय. औरंगाबादमध्ये त्यांनी हे आरोप केले. तसेच याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही विलास औताडे यांनी सांगितले.
काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विजय औताडे म्हणाले, येत्या 22 जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्हा दूध संघासाठी मतदान घेतले जाणार आहे. यात फुलंब्री मतदारसंघातून तालुकाध्यक्ष संदीप बोरसे हे भाजपच्या पॅनलकडून लढत आहेत. हरिभाऊ बागडेंना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सुरेठ पठाडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न औरंगाबाद तालुकाध्यक्ष रामराव शेळके यांनी केला. जिल्हाध्यक्षांच्या अॅडजस्टमेंटच्या राजकारणाने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरत असून जिल्हाध्यक्ष भाजपसोबत का गेले, याचा त्यांनी खुलासा करावा. तसेच बाजार समितीची चौकशी सुरु असल्यामुळे ते भाजपला साथ देत आहेत का, असा सवालही विजय औताडे यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. सहकारातील निवडणूकांसाठी नाही. दूध संघाची निवडणूक ही सहकार क्षेत्राची आहे. जिल्हा दूध उत्पादक संघ टिकला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. यात कोणतेही राजकारण नाही. ज्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यात काँग्रेसचेच तीन उमेदवार आहेत. त्यामुळे सर्वांना निवडून द्यावे, असे आवाहन मी करत आहे. यात वावगे काय, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघातील 14 पैकी सात जागांवरील संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत सात जागांसाठी येत्या 22 जानेवारी रोजी मतदान होईल. यापैकी फक्त औरंगाबाद तालुका मतदारसंघातून संघाचे विद्यमान अध्यक्ष भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम आहे. त्यांचीच मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे, असा आरोप विलास औताडे यांनी केला आहे.
इतर बातम्या-