देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचं टार्गेट.. अंबादास दानवे म्हणाले, उद्धव ठाकेरेंनी त्यावेळी…
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत.
दत्ता कनवटे, औरंगाबादः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले, असे गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही प्रत्युत्तर दिलंय. अशा प्रकारे तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र भाजप करते. पण उद्धव ठाकरे अतिशय सामंजस्याने काम करतात. 50 लोक निघून गेले मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी वजन वापरलं नाही. ते त्यांचं वजन वापरू शकत होते.. असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.
देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय. औरंगाबादमध्ये टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी बातचित केली. दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्यच असल्याचं दानवे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत. माझ्याकडून कोणतंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरे यांनी बंद केले. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो, तरीही ते असं वागले. मविआने अडीच वर्ष माझ्यावर केसेस टाकण्याचं, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलं होतं, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या काळात असा कोणताही प्रयत्न झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे आरोप केले असतील पण माझ्या माहितीप्रमाणे असं काहीही नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेची अपेक्षा आहे. त्यांचे आरोप बघून आप से ये उम्मीद न थी.. असंच म्हणावं लागेल, असा टोमणा सुप्रिया सुळेंनी लगावला. फडणवीस यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करावं, राज्यात गुन्हेगार वाढत चालली आहे, त्याकडे लक्ष द्यानं, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला.